मुंबई: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री घरात शिरलेल्या चोराने धारदार शस्त्राने वार केले होते. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्या मानेवर आणि पाठीवर खोलवर जखमा झाल्या होत्या. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. ही अत्यंत हायप्रोफाईल केस असल्याने मुंबई पोलिसांची तब्बल 15 पथकं या घटनेचा तपास करत आहेत. सुरुवातीला मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये सैफ अली खानच्या इमारतीत, गेटवर किंवा मजल्यावर कोणत्याही संशयास्पद व्यक्तीचा वावर दिसून आला नव्हता. त्यामुळे चोर सैफच्या घरात कसा शिरला, हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. अखेर पोलिसांनी सकाळपासून वेगाने काम करत सैफची इमारत आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासाअंती पोलिसांना एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या आहेत. 


हे सीसीटीव्ही फुटेज सैफ अली खानच्या घराच्या परिसरातील आहे. यामध्ये दिसणाऱ्या दोन संशयित व्यक्तींपैकी एकाने सैफ अली खानवर हल्ला केला  असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. परंतु, तपासावेळी पोलिसांच्या हाती आणखी एक माहिती लागली आहे. त्यानुसार सैफच्या इमारतीमध्ये काम करणारा एक व्यक्ती या दोन संशयितांच्या ओळखीचा असून तो या सगळ्यात सामील असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आता पोलिसांचा तपास सुरु आहे.


पोलिसांनी सध्या या दोन संशयित व्यक्तींना शोधण्यासाठी आपली पथके कामाला लावण्यात आली आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत पोलिसांची 7 आणि गुन्हे शाखेची 8 पथके तपास करत आहेत. चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या इमारतीत आणि घरात शिरला असावा, याचा शोध घेतला जात आहे. या इमारतीला एक फायर एक्झिट आणि डक्ट एरिया आहे. मात्र, या जागेतून कोणीही आत शिरण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी तुर्तास फेटाळून लावली आहे. 


प्रायव्हेट लिफ्टने घात केला?


सैफ अली खान आणि करिना कपूर हे वांद्रे येथील सतगुरु शरण या इमारतीमध्ये राहत होते. इमारतीच्या 12 व्या मजल्यावर सैफ अली खानचे घर होते. या घरात जाण्यासाठी एक खासगी लिफ्ट होती. या लिफ्टनेच चोर घरात शिरला असवा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, ही प्रायव्हेट लिफ्ट अॅक्सेस कार्डशिवाय वापरता येत नाही. त्यामुळे हा चोर घरातील कोणत्या व्यक्तीच्या मदतीनेच आत शिरला असावा, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


सैफ अली खानवर शस्त्रक्रिया


सैफ अली खान याच्यावर चोराने एकूण सहा वार केले. त्यापैकी त्याच्या मानेवर 10 इंचाची खोल जखम झाली आहे. तर पाठीत धारदार शस्त्राचे पाते रुतून बसले होते. सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पाठीतील रुतलेले शस्त्राचे पाते काढण्यात आले. 



आणखी वाचा


सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला, लेक इब्राहिम रुग्णालयात घेऊन गेला; महत्त्वाचे 5 मुद्दे; आतापर्यंत काय-काय घडलं?