Rohit Bal : बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इंडस्ट्रीतील लोकप्रिय फॅशन डिझायनर रोहित बाल (Rohit Bal) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं समोर आलं आहे. एनसीआर येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


रोहित बाल यांची प्रकृती नाजूक


बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे.  एनसीआर येथील मेदांता रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित तब्येतीच्या कारणाने चर्चेत आहे. रोहित बाल यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.


रोहित बाल यांचा जन्म 8 मे 1961 रोजी श्रीनगरमध्ये झाला आहे. आता ते 62 वर्षांचे आहेत. 2010 मध्ये रोहित यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रोहित यांना दारूचं व्यसन होतं. रोहित यांची 2022 मध्येही तब्येत खालावली होती. त्यावेळीही त्यांच्यावर मेदांता रुग्णालयातच उपचार सुरू होते. पण त्यावेळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल!


देशातील लोकप्रिय फॅशन डिझायनरच्या यादीत रोहित बाल यांचा समावेश होतो. मुगल फॅशनला प्रोत्साहन देण्यात रोहित बाल यांचा मोठा वाटा आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी रोहित यांचे फॅशन स्टोर आहेत. हिंदी मनोरंजनसृष्टीत रोहित खूपच लोकप्रिय आहे. अमिताभ बच्चन, कंगना रनौत, काजोल, करीना कपूर, सोनम कपूर आणि ईशा गुप्तासह अनेक सेलिब्रिटींचे फॅशन डिझायनर रोहित आहेत. 2001 आणि 2004 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय फॅशन अवॉर्ड्समध्ये 'डिझायनर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोहितने 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातील बिग बी यांचे ड्रेस डिझाइन केले आहेत. 






रोहित बाल यांना शेजाऱ्यांशी झालेल्या वादावरुन अटक करण्यात आली होती. कार पार्क करण्यावरुन शेजाऱ्यासोबत रोहितचं भांडण झालं होतं. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसात रोहितची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी रोहित दारुच्या नशेत असून त्याने गोंधळ घातल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला होता. पण नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. 


संबंधित बातम्या


12th Fail : बॉक्स ऑफिस गाजवलेला '12 वी फेल' ऑस्करच्या शर्यतीत! विक्रांत मेस्सीने दिली माहिती