Kosala Movie :  भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) लिखित 'कोसला' (Kosala) या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच 'कोसला - शंभरातील नव्याण्णवांस...' या चित्रपटाची एका भव्य सोहळयात घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होते. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबला वादक केतन पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर ‘कोसला’ची सुंदर कलाकृती साकारली. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत. 


25 व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी 'कोसला' ही कादंबरी लिहिली


1963 मध्ये वयाच्या  25 व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. 2014 मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा 50 वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘’साहित्या इतकेच माझे चित्रपटांवरही प्रेम आहे. मला चित्रपटांमध्ये पाहाण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ‘कोसला’ साठी अनेक जण मला भेटले परंतु त्यांना ते जमले  नाही. मला यांच्याबाबतीतही तसेच वाटले. वर्षभरात म्हणतील काही जमत नाही आणि सोडून देतील. परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यामुळे मला उभारी मिळाली. पुढच्या कांदबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिला आहे.’’


सयाजी शिंदे म्हणाले, "मी कादंबरीतील उतारे पाठ केले होते"


तर अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, ‘’ जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कांदबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल, याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा फोन आला. आम्ही नेमाडे सरांसोबत एक-दोन मिटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी ‘कोसला’ला संमती दिली. सरांच्या सगळ्या नियंमांचे पालन करत आता या चित्रपटाची सुरूवात होत आहे.’’


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य राठी म्हणतात, '' भालचंद्र नेमाडे हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आम्ही चित्रपट करतोय. यासाठी मी मेहुल शाह यांचे आभार मानेन की, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. गावातील निरुत्साही वातावरण न आवडणाऱ्या, त्याचा तिटकारा वाटत असतानाही गावासाठी काहीतरी थोर स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची ही भावनिक कथा आहे. खरंतर चित्रपटाविषयी काही सांगायची गरजच नाही. कारण आपल्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. त्यामुळे आता ही कथा प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.' तर गायत्री पाटील म्हणतात, ‘’ भालचंद्र नेमाडे सर जळगावचे आहेत आणि मी सुद्धा. ‘कोसला’ मला भावण्याचे कारण म्हणजे या कांदबरीत महिलांना दिलेला सन्मान. त्यामुळे ही कथा मला विशेष वाटली.’’


संबंधित बातम्या:


Dharmaveer 2 : सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी, 'धर्मवीर 2' सिनेमाचं शूटिंग सुरु