Ravi Kishan :  लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) आधी भाजपचे खासदार रवि किशन (Ravi Kishan) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे खासदार आणि भोजपुरी स्टार रवि किशन यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केलेत. अपर्णा ठाकूर नावाच्या एका महिलेने रवि किशन यांच्यावर पत्रकार परिषद घेत रवि किशन हे माझे पती असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता रवि किशन हे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. 


अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत रवि किशन यांच्यावर हे आरोप केले आहेत. यावेळी या महिलेने स्वत: भाजप खासदाराची पत्नी असल्याचा दावा देखील केला आहे. तसेच त्यांना एक मुलगी असून त्यांच्या मुलीला तिचे हक्क द्यायचे असल्याचं देखील या महिलेने म्हटलं आहे. 1996 मध्ये त्यांचं लग्न झालं असल्याचं देखील या महिलेने म्हटलं आहे.  त्यांच्या लग्नात कुटुंबिय आणि मित्रमंडळी देखील सहभागी झाले असल्याचं अपर्णाने म्हटलं आहे. दरम्यान रवि किशन यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या मुलीचं नाव शेनोवा असं आहे. आपल्या मुलीला तिचे हक्क मिळत नसल्याने पत्रकार परिषद घेत असल्याचं या महिलेने म्हटलं आहे. 


मुलीला दत्तक घेण्याची केली मागणी


अपर्णाने यावेळी मुलीला दत्तक घेण्याची देखील मागणी केली आहे. नाहीतर तिला तिचे कायदेशीर हक्क द्यावेत असं देखील तिनं म्हटलं. अपर्णा म्हणाली की रवी किशनला ती आपली मुलगी आहे असे वाटते पण तो ते सार्वजनिकपणे स्वीकारत नाही.महिलेने सांगितले की, 1996 मध्ये मुंबईत रवी किशनसोबत तिचा विवाह झाला होता. त्यावेळी रवी किशनचे अनेक मित्रही त्यांच्यासोबत होते. तिच्याकडे रवी किशनचे फोटो देखील आहेत जे त्यांनी एकत्र काढले होते. 


चार वर्षांपासून कुठलाही संबंध नसल्याचा दावा


या पत्रकार परिषदेदरम्यान अपर्णा ठाकूर हिनं म्हटलं की, जेव्हा आमची मुलगी 15 वर्षांची होती, तेव्हा तिला कळालं की रवि किशन तिचे वडिल आहेत. त्याआधी ती त्यांना काका बोलायची. ते तिच्या वाढदिवसाला घरी देखील यायचे. पण एका वडिलांसारखे ते कधीच तिच्यासोबत नव्हते. मागील चार वर्षांपासून रवि किशन यांनी त्यांच्यासोबत कोणताही संपर्क केला नसल्याचा दावा मुलीने केला आहे. तसेच रवि किशन यांनी शेनोवाला बॉलीवूडमध्ये काम मिळवून देण्याचं देखील आश्वासन दिलं होतं, असा दावा देखील तिने यावेळी केला आहे. त्यामुळे आता या मायलेकी कोर्टाची पायरी चढणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 




ही बातमी वाचा : 


Priyanaka Viral Video : प्रियांकावर का आली भीक मागण्याची वेळ? सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कारणही सांगितलं