Arbaaz Khan Post : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण त्या सगळ्या चर्चांना भाईजानचं कुटुंब देखील चोख उत्तर देत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच अरबाज खानची एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलीये.अरबाजने (Arbaaz Khan) या सगळ्या चर्चा करणाऱ्यांना चांगलच फटकारलं असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान कमाल खान याने सलमान खानवर टीका करत हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं होतं. 


बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर 14 एप्रिल रोजी सकाळी गोळीबार झाला. त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानी हा गोळीबार करण्यात आला. पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी अज्ञातांकडून जो गोळीबार करण्यात आला त्यामधील एक गोळी सलमानच्या घरात देखील घुसल्याचं सांगण्यात येत होतं. पण या घटनेनंतर सलमानने स्वत:ला अजिबात निराश न केल्याचं पाहायला मिळतंय. कारण नुकतच सलमानने त्याच्या एका नव्या फिटनेस ब्रँडच्या लॉन्चची घोषणा केली आहे. 


अरबाजने पोस्टमध्ये काय म्हटलं?


अलीकडेच घडलेली मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंब हादरले आहे. दुर्दैवाने, आमच्या कुटुंबाच्या जवळ असल्याचा दावा करणारे आणि प्रवक्ते असल्याचे भासवणारे काही लोक मीडियामध्ये अशी विधाने करत आहेत की हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कुटुंबाला याचा काहीही परिणाम होत नाही, जे खरे नाही आणि या गोष्टी गांभीर्याने घेऊ नयेत. या घटनेबाबत सलीम खान कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मीडियात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. या अप्रिय घटनेच्या तपासात सध्या कुटुंबीय पोलिसांना मदत व सहकार्य करत आहेत. आम्हाला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि ते आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्व काही करतील याची खात्री देण्यात आली आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार, अशा आशयाची पोस्ट आरबाजने केली आहे. 






कमाल खानची टीका


अभिनेता कमाल खान हा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत असतो. सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराच्या घटनेनंतर कमाल खानने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. कमाल खानने ट्वीट करत म्हटले की, 'हे सगळं सल्लूचे (सलमान खान) नाटक आहे. सल्लू हा भारतातील सर्वात मोठा गँगस्टर आहे आणि इतर सर्व गुंड त्याच्यासाठी काम करतात. पहाटे 5 वाजता सर्वजण झोपलेले असताना हवेत गोळीबार का केला? प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळावी म्हणून त्याने ही सगळी व्यवस्था केली असावी! कारण त्याला माहित आहे की त्याने सुशांत सिंगला काय केले हे मी उघड करणार आहे, असे कमाल खानने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. 


ही बातमी वाचा : 


Salman Khan : सगळी ड्रामेबाजी, सलमान खान हाच मोठा गँगस्टर; अभिनेत्याच्या वक्तव्यावर चाहते संतापले