Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मुंबईतील वांद्रे येथे रवीना टंडनच्या ड्रायव्हरने एका महिलेवर कार अंगावर घातल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर एका मुलीला आणि वृद्ध महिलेला मारहाणही केल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकाराची नोंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच न्याय हवा असल्याचंही म्हटलं जात आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवीना टंडनच्या ड्रायव्हरने एका महिलेवर कार अंगावर घातल्याचा दावा केल्याने स्थानिक लोक त्याला मारहाण करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री त्याला सोडण्याचं आवाहन करताना दिसत आहे. 






नेमकं प्रकरण काय?


डीसीपी राजतिलक रौशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लग्नामधून महिला रस्त्यावरून जात होती. त्यावेळी रवीना टंडन यांचा ड्रायव्हर कार मागे घेत होता. दरम्यान समोरुन जात असलेल्या वयस्कर महिलेने ड्रायव्हरने कार अंगावर घातल्याचा दावा केला आहे. पुढे रवीना टंडन यांचा ड्रायव्हर आणि महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही पार्टी खार पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर दोन्ही पार्टींनी तक्रार द्यायला नाकार दिला आणि घरी गेले.  पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलेलं दिसून आलं.


रवीनाकडून कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही 


पोलिसांनी केलेल्या तपासात हे दावे खोटे आढळले. याप्रकरणी दोन्ही पार्टीने पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तक्रार दाखल झाली नाही. या प्रकरणी रवीना टंडनकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक रवीना टंडनसोबत वाद घालताना दिसत होते. तेही धक्काबुक्की करत होते. यासोबतच रवीनाच्या ड्रायव्हरने वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप लोक करत होते. आता या प्रकरणावर अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


वाढत्या वयामुळे डावलणाऱ्यांविरोधात रवीना टंडन कडाडली; म्हणाली, "मला अन् माधुरीला टार्गेट केलं जात"