Randeep Hooda Majha Katta : लोगों का काम है कहना.. पण सत्यपरिस्थिती मला माहिती आहे. मी हा सिनेमा रागात बनवला आहे, असं वक्तव्य अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानिमित्ताने रणदीपने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्याने या सिनेमासंदर्भातील विविध गोष्टींवर भाष्य केलं. या सिनेमासाठी अभिनेत्याने 30 किलो वजन कमी केलं आहे. तसेच स्वत:चं घरदेखील त्याला विकावं लागलं आहे.


'स्वातंत्र्यवीर सावरकर'ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,"लोगों का काम है कहना.. पण सत्यपरिस्थिती मला माहिती आहे. मी हा सिनेमा रागात बनवला आहे. सावरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हा सिनेमा बनवला आहे. या सिनेमासाठी मला घर विकावं लागलं आहे. प्रपोगंडा सिनेमा बनवायला कोण एवढी मेहनत घेतं?"


रणदीप पुढे म्हणाला,"सावरकर माझ्या आयुष्यात आल्यापासून मी काळ्या पाण्याची शिक्षा भोगतो आहे. दोन वर्ष, दिवसरात्र मी त्यांचाच विचार करत आहे. अभिनेता म्हणून मी कमी लक्ष दिलं आहे. या सिनेमासाठी मी 30 किलो वजन कमी केलं आहे. हा प्रवास खडतर होता". 


रणदीपने 30 किलो वजन कसं कमी केलं? 


वजन कमी करण्याबद्दल रणदीप म्हणतो,"माझी बहिन न्यूट्रिशन स्पेशलिस्ट आहे. तिने सांगितलेल्या गोष्टी मी फॉलो केल्या. 16 ते 20 तास मी काही खास नसे. फक्त पाणी प्यायचो. ब्लॅक कॉफी, ग्रीन टी या गोष्टींचे सेवन करत असे. 16 तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही उपवास ठेवता तेव्हा तुमचं शरीर स्वत: ते रिपेअर करू लागतं. आठवड्यातून 1-2 दिवस प्रत्येकाने उपवास ठेवायला हवा. त्यामुळे तुमचं शरीर रिसेट होईल. ऑमलेट, ड्रायफ्रूट या गोष्टी मी खात असे. एक चमचा नारळाचं तेळ, बदामाचं तूप आणि दोन काजू असा डाएट मी फॉलो केला आहे." 


सावरकरांचं कार्य जगभरात पोहोचवायचं आहे : रणदीप हुड्डा


'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,"स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं व्यक्तिमत्त्व लार्जर दॅन लाईफ होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सिनेमा का बनवू नये. शाळेत असल्यापासून मला इतिहासाची आवड आहे. गणितापेक्षा इतिहास विषय जास्त आवडायचा. या सिनेमासाठी मला विचारणा झाली तेव्हा सगळ्यात आधी मी विचार केला की मी त्यांच्यासारखा दिसत नाही. वीर सावरकर आणि काळ्या पाण्याची शिक्षा यापलीकडे सावरकर मला माहिती नव्हते. पुढे मी त्यांच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. प्रचंड रिसर्च केल्यानंतर सावरकर किती महान व्यक्तिमत्त्व आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी सावरकरांची गोष्ट महाराष्ट्राबाहेर का पोहोचली नाही? असा प्रश्न मला पडला. सावरकरांसोबत अन्याय झाल्याचं मला वाटलं. आता माझं कर्तव्य आहे की त्यांना न्याय मिळवून देणं. सावरकरांचं कार्य जगभरात पोहोचवायचं आहे".


रणदीप पुढे म्हणाला,"स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कविता सर्वांनीच ऐकल्या आहेत. त्यामुळे सिनेमात त्यावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. आपल्याकडे प्रदर्शित होणारे बायोपिक देशभक्तीपर भाषण देणारे असतात. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमांसोबत जास्त जोडले जात नाहीत. पण या सिनेमात मी अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार कसे बदलत गेले, व्यक्तिमत्त्व कसे बदलत गेले हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात प्रेक्षकांना नाट्य, संगीत या गोष्टी भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळतील. जबाबदारीने मी हा सिनेमा बनवला असून अनेक गोष्टींवर आवाज उठवला आहे".



संबंधित बातम्या


Swatantra Veer Savarkar Movie : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतूने रणदीप हुड्डाला झापलं, नेताजी हे धर्मनिरपेक्ष प्रखर देशभक्त, सावरकरांसोबत...