Swatantra Veer Savarkar Movie : अभिनेता रणदीप हुड्डा याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात वीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सावरकरांची स्वातंत्र्य चळवळ, अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा, हिंदू महासभेचे कार्य आदी दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय, ट्रेलरमध्ये महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यासह सुभाषचंद्र बोसही दिसले आहेत. ट्रेलरवरून अनेकांनी चित्रपटाच्या मांडणीवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस (Chandrakumar Bose) यांनीही रणदीप हुड्डाला सुनावले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील संवाद दाखवला आहे. या दृश्यात जर्मनी आणि जपानी सैन्याच्या अत्याधुनिक शस्त्रांसह ब्रिटीश साम्राज्यावर हल्ला करावा असे सावरकर हे नेताजी बोस यांना सांगताना दिसत आहेत. आता या दृश्यावरूनही अनेकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकरांच्या हिंदुत्ववादी आणि मोहम्मद अली जिना यांच्या पाकिस्तानधार्जिण्या राजकारणाला विरोध केला असल्याचा दाखला देण्यात येत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी रणदीप हुड्डाला म्हटले की, सावरकर यांच्यावर चित्रपटाची निर्मिती केली, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक आहे. पण अशा चित्रपटांमधून तथ्य, खरे व्यक्तीमत्त्व समोर येणे आवश्यक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संबंध जोडताना नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हे धर्मनिरपेक्ष आणि महान देशभक्त होते हे विसरता कामा नये असेही चंद्रकुमार यांनी म्हटले.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमात सावकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा असून त्यांच्या पत्नीची भूमिका अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) साकारली आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डाने केले आहे. या आधी महेश मांजरेकर हे दिग्दर्शन करत होते. मात्र, काही कारणास्तव त्यांनी हा चित्रपट सोडला.