Raju Srivastava Health Update: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. बुधवारी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर पडले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. मात्र, वडिलांच्या तब्येतीत अद्याप कोणतीही सुधारणा झाली नसल्याची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे.
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. राजू सध्या व्हेंटिलेटरवर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दरम्यान, त्यांच्या मुलीने वडिलांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
अद्याप प्रकृतीत सुधारणा नाही!
एका वेबसाईटला माहिती देताना राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने, अंतरा श्रीवास्तव हिने सांगितले की, ‘माझे वडील कामानिमित्त दिल्ली आणि देशभरात अनेक ठिकाणी दौरे करत असायचे. मात्र, या सगळ्या दिनक्रमातही ते न चुकता दररोज एक वेळ वर्कआऊट करायचे. त्यांनी व्यायाम कधीच चुकवला नाही. ते अगदी ठणठणीत बरे होते. त्यांना कधीच हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. त्यामुळे त्यांचं अशा प्रकारे आजारी पडणं आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. डॉक्टर त्यांचे पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. आम्ही सतत प्रार्थना करत आहोत, की त्यांना लवकर बरे वाटावे. आम्हाला आशा आहे, ते लवकर बरे होतील. आई सध्या त्यांच्यासोबत आयसीयूमध्ये थांबली आहे.’
मेंदू पूर्णपणे काम करण्यात असक्षम
पिंकविलाशी यासंदर्भात बोलताना राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र आणि स्टँड-अप कॉमेडियन एहसान कुरेशी म्हणाले की, ‘राजू श्रीवास्तव गेल्या 25-30 तासांपासून बेशुद्ध आहेत. डॉक्टरांनी तूर्तास थांबून त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा होते का, हे पाहण्यास सांगितले आहे. काही तासांपूर्वी डॉक्टरांनी सांगितले की, राजू यांनी काही किरकोळ हालचाली केल्या. पण, त्यांचा मेंदू अजूनही पूर्णपणे काम करत नाहीय, तसेच ते उपचाराला प्रतिसादही देत नाहीयत.’
राजू श्रीवास्तव 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर ते देशभरात लोकप्रिय झाले. 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' आणि 'आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया' या चित्रपटातही त्यांनी काम केले. राजू श्रीवास्तव 'बिग बॉस सीझन 3’मध्येही सहभागी झाले होते. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.
वाचा इतर बातम्या :