Raju Srivastav : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना दिल्लीमधील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.


दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेड मिलवर धावताना राजू कोसळले. तिथे ते बेशुद्ध पडले. राजू यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, वर्कआउट करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार आता ते शुद्धीवर आले आहेत. डॉक्टर लवकरच त्यांच्या प्रकृतीची माहिती देतील.


एक ऑगस्टला गेले होते दिल्लीला 
राजू श्रीवास्तव हे एक ऑगस्टला दिल्लीला गेले होते. तर 29 जुलैला राजू श्रीवास्तव हे मुंबईमधून उदयपूर येथे गेले होते. 30 जुलैला ते एका शोमध्ये सहभागी झाले होते. दिल्लीमध्ये राजू श्रीवास्तव यांचे दोन भाऊ राहतात. राजू हे भावांना आणि त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये राहात होते. यावेळी एम्स रुग्णालयाचे डॉक्टर राजू श्रीवास्तव यांच्या ऑपरेशनबाबत निर्णय घेत आहेत.


राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही  राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच  'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात. 


वाचा इतर बातम्या: