Rajinikanth : थलायवा रजनीकांत (Rajinikanth) हे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहे. रजनीकांत आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या रजनीकांत यांना साऊथमध्ये देवाचा दर्जा दिला जातो. जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. रजनीकांत यांनी आपल्या करिअरमध्ये एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. थलायवाचा आजही बोलबाला कायम आहे. अभिनयक्षेत्रात येण्याआधी रजनीकांत यांनी कंडक्टर म्हणून काम केलं आहे. रजनीकांत यांच्या 'जेलर' (Jailer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे.


'असा' मिळाला रजनीकांत यांना पहिला सिनेमा (Rajinikanth First Movie)


सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी रजनीकांत कंडक्टर म्हणून काम करायचे. हिरो व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. हिरो होण्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे मित्र राज बहादुर यांनी त्यांना साथ दिली आहे. राज बहादुर यांनी रजनीकांत यांना मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याला सल्ला दिला होता. रजनीकांत यांना 1975 मध्ये 'अपूर्वा रागनगाल' या सिनेमाच्या माध्यमातून पहिला ब्रेक मिळाला. पण 1983 मध्ये आलेल्या 'अंधा कानून' या सिनेमामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. 


रजनीकांत यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली भाषेतील सिनेमांत काम केलं आहे. रजनीकांत हे भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. भारताबाहेरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुकमध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आलं आहे. रजनीकांत यांनी राजकारणातही एन्ट्री घेतली होती. 


मराठी कुटुंबात जन्मलेले रजनीकांत


रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. बंगळूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीकांत बस कंडक्टर म्हणून काम करू लागले. त्यावेळी त्यांची तोंडाने शिट्टी वाजवण्याची कला लोकप्रिय झाली होती. 


कोट्यवधींची कमाई करणारे रजनीकांत (Rajinikanth Net Worth)


रजनीकांत यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात दोन हजार रुपयांपासून केली आहे. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी श्रीदेवींसोबत एका सिनेमा केला होता. या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना दोन हजार रुपयांचं मानधन मिळालं होतं. पण आजच्या घडीला रजनीकांत एका सिनेमासाठी 100 कोटींपेक्षा कमी मानधन घेत नाहीत. 'जेलर' या सिनेमासाठी त्यांनी 110 कोटी रुपये आकारले होते. सिनेमांसह रजनीकांत यांना महागड्या, आलिशान गाड्यांचीदेखील आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. 


संबंधित बातम्या


Rajinikanth and Kamal Haasan: दोन सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये! 21 वर्षानंतर रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकाच स्टुडिओमध्ये केलं चित्रपटांचे शूटिंग