Radhika Apte on Tollywood Film Industry : राधिका आपटे (Radhika Apte) आपल्या दर्जेदार अभिनयामुळे ओळखली जाते. तिने हिंदीसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अशातच आता अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री टॉलिवूडवर (Tollywood) निशाणा साधताना दिसून येत आहे. 


राधिका आपटेचा 'तो' व्हिडीओ व्हायरल (Radhika Apte Video)


राधिका आपटेचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती पत्रकार राजीव मसंद यांच्यासोबत संवाद साधताना दिसत आहे. दरम्यान तिने तेलुगू सिनेसृष्टीबद्दल भाष्य केलं आहे. राधिका म्हणते,"तेलुगू सिनेसृष्टीत अर्थात टॉलिवूडमध्ये मला सर्वात जास्त संघर्ष करावा लागला आहे. टॉलिवूड पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान आहे. सिनेमांत महिलेला चांगला दर्जा देत असले तरी प्रत्यक्षात सेटवर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळेल. पुरुष कलाकारांचा महिला कलाकारांसोबतचा व्यवहार खूपच वेगळा आहे. 






राधिका आपटे नेटकऱ्यांकडून ट्रोल


राधिका आपटेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल केलं जात आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर यामुळेच टॉलिवूडला तुझी गरज नाही, टॉलिवूडनेच 'बाहुबली', 'पुष्पा' आणि 'अॅनिमल'सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. एक वाईट अनुभव संपूर्ण इंडस्ट्रीबद्दल नसू शकतो. तेलुगू इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न, काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला चुकीचं ठरवू नये, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


राधिका आपटेचा टॉलिवूड प्रवास जाणून घ्या.. (Radhika Apte Tollywood Movies)


राधिका आपटेने 2014-15 मध्ये तेलुगू स्टार नंदामुरी बालकृष्ण यांच्यासोबत दोन टॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. 'लीजेंड' आणि 'लायन' अशी या सिनेमांची नावे आहेत. राधिकाचे हे दोन्ही टॉलिवूडपट सुपरहिट झाले होते. या दोन सिनेमांव्यतिरिक्त अभिनेत्रीने कधीही तेलुगू सिनेमांत काम केलेलं नाही. 


राधिकाची सिनेकारकीर्द जाणून घ्या... (Radhika Apte Movies)


राधिकाने तामिळ, मराठी, तेलुगू आणि इंग्रजी या भाषांतील सिनेमांत काम केलं आहे. वाह लाईफ हो तो ऐसी, अंतहीन, वेटिंग रुम, रक्तचरित्र, शोर इन द सिटी, कबाली, पॅडमॅन, अंधाधून अशा अनेक सिनेमांत राधिकाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. राधिकाचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.


संबंधित बातम्या


Radhika Apte: 'पाणी नाही, टॉयलेट नाही...'; राधिका आपटेची संतप्त पोस्ट, नेमकं प्रकरण काय?