Pushpa 2 Box Office Collection Day 3: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) यांच्या पुष्पा 2 (Pusha 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने 164.25 कोटींची दमदार ओपनिंग करुन या सिनेमाने भारतीय चित्रपट उद्योगातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. हा चित्रपट केवळ पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला नाही तर दुसऱ्या दिवशीही बंपर कमाईही केली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचेही आकडे समोर आले आहेत.
'पुष्पा 2' चे बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन
सॅनसिल्कच्या वृत्तानुसार, पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये कमावले होते.या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 93.8 कोटींची कमाई केली होती. आता तिसऱ्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत 81.78 कोटी रुपयांच्या कमाईसह एकूण 350.48 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. मात्र, हे आकडे अंतिम नाहीत. त्यात आता बदल होऊ शकतात.
सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 लाही मागे टाकलं
सॅनसिल्कच्या वृत्तानुसार,सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 या दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत 247.71 कोटी रुपये आणि 259.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण पुष्पाने अवघ्या दोनच दिवसांत या सिनेमांना मागे टाकलंय.
देवराचा बॉक्स ऑफिस रेकॉर्डही मोडला
आज या चित्रपटाने ज्युनियर एनटीआरच्या देवरा चित्रपटाचे कलेक्शन देखील पार केले आहे. देवराने 292.03 कोटींची कमाई केली आहे.
सलमान-आमिरच्या चित्रपटांचे रेकॉर्ड्सही तुटले!
पुष्पा 2 ने सलमान खानचा ब्लॉकबस्टर टायगर जिंदा है (339.16 कोटी), आमिर खानचा पीके (340.8 कोटी), थलपथी विजयचा लिओ (341.04 कोटी), संजू (342.57 कोटी) आणि जेलर (348.55 कोटी) हे रेकॉर्ड तोडले आहेत.
पुष्पा 2 चे बजेट
GQ India च्या मते, पुष्पा 2 चे बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे. चित्रपटाचे कलेक्शन ज्या प्रकारे वाढत आहे, ते पाहता वीकेंडच्या शेवटी हा चित्रपट आपले बजेट कव्हर करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन ही जोडी 2021 साली प्रदर्शित झालेला पुष्पा पुन्हा एकदा परतला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. लवकरच, पुष्पाच्या तिसऱ्या भागावरही काम सुरू होईल, ज्याची घोषणा पुष्पा 2 च्या शेवटीच झाली आहे.