मुंबई : हॉलिवूड सिनेमात आपल्या अभिनयाची जबरदस्त छाप सोडल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली.


प्रियांकाने प्रादेशिक भाषांमधील सिनेमांची निर्मिती केली. ज्यामध्ये तिला चांगलं यशही मिळालं. त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत ती हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे, असं मधू चोप्रा यांनी सांगितलं.

हॉलिवूड सिनेमा महिला सक्षमीकरण किंवा वंशद्वेशावर आधारित असेल. ज्यांना कुणाचा आधार नाही, अशांना अधिकार मिळवून द्यायचे असं, प्रियांकाने सिनेमा निर्मितीत पाऊल ठेवतानाच ठरवलं होतं. यावर्षी आमचे तीन प्रादेशिक भाषांमधले सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता प्रियांकाची बॉलिवूड सिनेमाची निर्मिती करण्याचीही इच्छा आहे. हॉलिवूड सिनेमाची निर्मिती प्रक्रिया या वर्षाअखेरपर्यंत सुरु होईल, असं मधू चोप्रा म्हणाल्या.

प्रियांकाला व्यवसायायिक ज्ञानही उत्तम आहे. चांगली स्टोरी आणि बजेटही आवाक्यातलं असायला हवं. प्रियांका कोणताही निर्णय योग्यच घेईल, असा विश्वास असल्याचं मधू चोप्रा यांनी सांगितलं.

प्रियांका चोप्राने क्वांटिको या मालिकेतून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने बेवॉच या सिनेमातूनही तिच्या अभिनयाची जगावर छाप सोडली. आता ती सिनेमा निर्मिती करणार आहे.

प्रियांकाने व्हेंटिलेटर या मराठी सिनेमाचीही निर्मिती केली आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं होतं.