गाडीचा ड्रायव्हर कोण आहे यावर अवलंबून असतं की तो ड्रायव्हर गाडी कशी चालवणार आहे. म्हणूनच सिनेमा ही जर गाडी असेल तर त्याचा चालक असतो दिग्दर्शक. बाकी सगळे मुख्य भूमिका, तांत्रिक विभाग आदी सगळे या गाडीचे पार्ट्स असतात असं म्हणू. पानिपत या सिनेमाकडे लोकांचं लक्ष आहे कारण हा सिनेमा आशुतोष गोवारीकरचा आहे. ज्या दिग्दर्शकाने लगान, स्वदेस, जोधा-अकबर यांसारखे चित्रपट दिले आणि जो दिग्दर्शक सतत नव्या नव्या शक्यतांचा विचार करत असतो अशात आघाडीचं नाव गोवारिकर यांचं आहे. असा दिग्दर्शक जेव्हा पानिपतसारख्या भळाळत्या जखमेकडे लक्ष द्यायला लागतो तशी उत्सुकता वाढू लागते. संजय दत्त, क्रिती सेनॉन, अर्जुन कपूर, रवींद्र महाजनी आदी अनेक कलाकारांची मोठी फोज या सिनेमात असल्यामुळे ही उत्सुकता आणखी वाढली. सिनेमाचा ट्रेलर आला आणि सकारात्मक सूरासोबत काही कोमल सूरही लागले. यात सवाल होता सदाशिवराव भाऊ पेशवे यांची भूमिका साकारलेल्या अर्जुन कपूरबाबत. ट्रेलरमध्ये तो आपली छाप पाडू शकला नव्हता. तरीही आपला विश्वास दिग्दर्शकावर असतो. दिग्दर्शक उत्तम असला तर पठडीबाज अभिनेत्यालाही तो त्याच्या छापाबाहेर काढतोच की. शाहरूख खानचं उदाहरण घ्या. स्वदेस, चक दे, पहेली आदी सिनेमात ते झालं. पण अर्जुन कपूरबाबत जरा गोची झाली आहे. त्याची देहबोली, शब्दफेक सदाशिव पेशवे साकारण्यात कमी पडते. म्हणूनच सिनेमाचा सरासरी वेग खाली येतो. हे म्हणजे, ड्रायव्हर कितीही चांगला असला तरी कमी पॉवरचं इंजिन असेल तर बाकी सगळं भारी असलं तरी गाडी तरी किती पळणार असं झालं आहे.


पानिपत... मराठी मनात रूतलेली जखम आहे. या लढाईत हार पत्करूनही बाजीगर ठरले ते आपले मराठी वीर. 17 व्या शतकात अहमदशाह अब्दालीसोबत घनघोर युद्धानंतर दिल्लीवर राज्य करण्याच्या मनसुब्याने आलेला तोच अब्दाली थेट कंदाहारमध्ये जातो कारण, त्याला पेशव्यांनी आणि पर्यायाने मराठा सैन्याने अपेक्षेपेक्षा कैक पटींनी लढा देत त्याच्या सैन्याला खिंडार पाडलं. रसद आणि दारूगोळा आणखी असता तर कदाचित आपण अब्दालीवर विजय मिळवू शकलो असतो. अर्थात हा इतिहास आपल्या सर्वांना माहीती आहे. आशुतोष गोवारिकर यांनी तो इतिहास जागवला आहे.

या चित्रपटात तांत्रिक बाजू भक्कम आहेत. आवर्जून उल्लेख करायला हवा तो छायांकनाचा. चित्रपटातली प्रकाशयोजना चित्तवेधक आहे. संगीतामध्ये अजय अतुल यांनी पुन्हा आपली छाप पाडली आहे. मर्द मराठा आणि त्यातलं एक रोमॅंटिक गाणं श्रवणीय झालं आहे. शिवाय संकलनही नेटकं. मुद्दा व्यक्तिरेखा निवडीबद्दल जेव्हा येतो तेव्हा, यातली प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहते. अनेक दिग्दर्शकीय पैलू इथे पाहायला मिळतात. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर असलेल्या गाण्यात शिवरायांच्या सूचक केलेलं पूजन रोमांचित करणारं आहे. शिवाय, युद्धातले प्रसंग श्वास रोखून धरायला लावतात ते त्यासाठीच. संपूर्ण सिनेमात हळहळ वाटत राहते ती अर्जुन कपूरच्या अभिनयाची. सदाशिवराव पेशवे यांची अपेक्षित देहबोली, संवादफेक त्याच्याकडे नाही. उत्तरार्धातल्या युद्धातल्या काही प्रसंगांमध्ये तो काही ठिकाणी कन्व्हीन्स होतो, पण जिथे संवादांची वेळ येते तिथे तो उणा वाटू लागतो. त्याच्या तोडीला क्रिती सेनॉनने पार्वतीच्या भूमिकेत बाजी मारली आहे. तिचे बरेचसे प्रसंग अर्जुनसोबत आहेत. ती कमालीची एक्स्प्रेसिव्ह असल्याचा तोटाही अर्जुनला झाला असावा. किंवा तो बराचसा प्लेन असल्यामुळे क्रिती जास्त एक्स्प्रेसिव्ह वाटत असावी. त्यामुळे सिनेमातल्या पार्वतीबाई भाव खाऊन जातात. सदाशिवभाऊचा वेग कमी पडल्यामुळे अनेक प्रसंग अंगावर येता राहतात. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो सदाशिवरावाच्या हाती पुन्हा तलवार आल्यानंतर त्याच्या डोळ्यात येणारी चमक, युद्धावेळी सैन्याला चेतवण्यासाठी त्याने केलेली आवाहनं, पत्नीसोबतचे त्याचे हळूवार भावबंध असे अनेक प्रसंग मनाचा ठाव घेत नाहीत. हे एक कास्टिंग दमदार झालं असतं तर सिनेमाने फार वरचा पल्ला गाठला असता असं वाटून जातं. या तुलनेत संजय दत्त, क्रिती सेनॉन यांसह सर्वच कलाकार चपखल आहेत. शाम मशाळकर, गश्मीर-रवींद्र महाजनी, अजित शिधये आदी अनेक मराठी कलाकारही यात आहेत. ते सगळेच आपापल्या भूमिकांमध्ये चोख बसले आहेत.

सर्व गोष्टी उत्तम जमल्या असूनही केवळ मुख्य व्यक्तिरेखा अपेक्षित आलेख साधत नाही हे मात्र महत्वाचं. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत तीन स्टार. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन एकदा पाहायला हवा असा आहे.