Oscars 2024: अभिनेता टोविनो थॉमसच्या (Tovino Thomas) 2018 एव्हरीवन इन ए हीरो(2018 Everyone is a Hero) या चित्रपटाची ऑस्कर 2024 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं याबाबत घोषणा केली आहे. 2018 Everyone is a Hero हा चित्रपट जूड अँथनी जोसेफनं दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट सुरुवातीला मल्याळम आणि नंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला.
2018 एव्हरीवन इन ए हीरो या चित्रपटाचे कथानक 2018 मध्ये केरळ येथे झालेल्या पूरस्थितीवर आधारित आहे. या काळात लोक या भीषण नैसर्गिक आपत्तीला धैर्याने कसे तोंड देतात याची कहाणी या चित्रपटात अतिशय सुरेखपणे मांडण्यात आली आहे.
चित्रपटाची स्टार कास्ट
टोविनो थॉमससोबतच चित्रपटात कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. 5 मे 2023 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. टोविनो थॉमसचा ' 2018 एव्हरीवन इज अ हिरो' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.दर वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विविध चित्रपटांना सन्मानित करण्यात येते. गेल्यावर्षी ‘छेल्लो शो’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी निवडला गेला आहे. आता यंदा 2018 एव्हरीवन इन ए हीरो या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी 'द एलिफेंट व्हिस्परर्स' या डॉक्युमेंट्रीनं आणि आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्यानं ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं होतं. आता यंदा कोणता भारतीय चित्रपट ऑस्कर जिंकणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: