(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'दिलबर दिलबर..' गाण्यावर थिरकलेली अभिनेत्री सलमानच्या चित्रपटात झळकणार
'दिलबर दिलबर..' गाण्याद्वारे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नोरा फतेही सलमान खानच्या चित्रपटात झळकणार आहे. 'दिलबर दिलबर..' गाणं कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं होतं.
मुंबई : 'दिलबर दिलबर..' गाण्याद्वारे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नोरा फतेही सलमान खानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. 'दिलबर दिलबर..' गाणं कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं होतं. या गाण्यातील हॉट डान्स आणि अदांमुळे प्रेक्षकांची नोराने वाहवा मिळवली होती. याच गाण्याच्या जोरावर नोराला बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली आहे.
सलमान खानच्या आगामी भारत सिनेमात नोराला एक गाणं ऑफर झालं आहे. या गाण्यासंबधीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र बॉलिवूड लाईफ डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, नोराची भारत सिनेमातील एका गाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र सिनेमातील या गाण्यात नोरा फतेहीसोबत सलमान थिरकणार आहे की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
नोराचं 'दिलबर दिलबर...' गाणं युट्यूबवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' सिनेमातील हे गाणं आहे. सुष्मिता सेनच्या सुपरहिट दिलबर दिलबर गाण्याला रिक्रिएट करुन हे गाणं तयार करण्यात आलं आहे.
नेहा कक्कडने या गाणं गायलं असून मुळ दिलबर दिलबर गाण्यातील काही भाग तसाच ठेवण्यात आला आहे. युट्यूबरवर 10 कोटींहून अधिकवेळा हे गाणं पाहिलं गेलं आहे.