Jai Bhim : सध्या सगळीकडे साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता सूर्याचा चित्रपट ‘जय भीम’ने (Jai Bhim) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाला जितकी प्रसिद्धी मिळाली, तितकाच तो वादातही अडकला होता. ‘जय भीम’ हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे, तर ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. प्रंचड लोकप्रियता मिळवलेला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. एका समाजाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने दाखवल्याप्रकरणी या चित्रपटाचा अभिनेता सूर्या (Suriya), दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आणि अभिनेत्री ज्योतिका (Jyothika) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मद्रास हायकोर्टात सुरु होते. या प्रकरणावर आता कोर्टाचा निर्णय आला आहे.


‘सूर्या आणि चित्रपटाच्या टीमवर कोणतीही कडक कारवाई करण्यात येऊ नये.’ असे कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. 18 जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये कोर्टाने आपला आदेश सुनावला आहे.


सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय


या प्रकरणाची सुनावणी सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. मद्रास हायकोर्टाने आदेश देताना म्हंटले की, पुढील सुनावणीपर्यंत सूर्या आणि त्याच्या टीमवर कोणतीही कडक कारवाई केली जाऊ नये. न्यायमूर्ती सतीशकुमार यांनी यावर सुनावणी करत ‘जय भीम’ प्रकरणावरील सूर्या आणि ज्ञानवेल यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जुलै रोजी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तोपर्यंत सूर्या, ज्योतिका आणि ज्ञानवेलसह संघातील कोणत्याही सदस्यावर कठोर कारवाई केली जाणार नाही.


नेमकं वादाचं कारण काय?


‘जय भीम’ या चित्रपटात समाजावर होणाऱ्या अत्याचारांचे धक्कादायक चित्रण करण्यात आले आहे. एक पोलीस एका विशिष्ट समाजाच्या लोकांना खोट्या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणतो आणि नंतर त्यांच्यावर कसा अत्याचार करतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. याशिवाय अभिनेते प्रकाश राज एका हिंदी भाषिक व्यक्तीला चापट मारताना दाखवण्यात आल्याच्या दृश्यावरही लोकांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटातील काही दृश्यांच्या या वादावरून सूर्याला अनेक धमक्याही देण्यात आल्या होत्या.


हेही वाचा :


Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार


Movie Review : 'जय भीम'... सिनेमा नाही तर चळवळ!


Jai Bhim चित्रपटातील सीनवरुन वाद शिगेला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल