हैदराबाद : प्रख्यात दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित आणि प्रकाशित झाल्यानंतर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयाने याचं खंडन केलं. रुग्णालयाने दुपारी एकच्या सुमारास निशिकांत कामत यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं आहे. निशिकांत कामत सध्या व्हेंटिलेटवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं.
दुपारी बारा-सव्वा बाराच्या सुमारास मीडियामध्ये निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित झालं होतं. त्यानंतर सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी निशिकांत कामत यांच्याबाबत ट्वीट केलं. मात्र यानंतर अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर अजून ते जिवंत असून लढत असल्याचं सांगितलं. यानंतर निशिकांत कामत यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम निर्माण झाला.
दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमधील रुग्णालयात दाखल
मग निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करुन या संभ्रमावर पडदा पाडला. निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असं रुग्णालयाने आपल्या मेडिकल बुलेटिनमध्ये नमूद केलं.
दरम्यान, निशिकांत कामत लिव्हर सिरोसिस नावाचा आजार झाला आहे. 31 जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.