हैदराबाद : 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटापासून सिनेकारकिर्दीची सुरुवात करणारे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. निशिकांत कामत लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारामुळे गेल्या 10 दिवसांपासून निशिकांत यांना हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे ते सध्या तो आयसीयूमध्ये दाखल आहेत.


मराठी चित्रपटाचे निर्माता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी एबीपी न्यूजला याबाबत माहिती दिली. अमेय खोपकर यांनी म्हटलं की, रुग्णालयात दाखल असलेले निशिकांत कामत हे गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत गंभीर पण स्थिर अवस्थेत आहेत. निशिकांत कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले आहे. सध्या त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली आहे.


पाच वर्षापूर्वी निशिकांत कामत यांनी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत 'दृष्यम', इरफान खानसोबत 'मुंबई मेरी जान' आणि 'मदारी', जॉन अब्राहमसोबत 'फोर्स' आणि रॉकी हँडसम' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. मराठी चित्रपटांमध्ये 'डोंबिवली फास्ट' व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन 'लय भारी', 'फुगे' या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'सातच्या आत घरात' हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता.


हिंदी चित्रपटांमध्ये विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित 'भावेश जोशी' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांतही निशिकांत कामत यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. 2022 मध्ये रिलीज होणार्‍या 'दर-ब-दर' या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ते तयारी करत होते.