Navratri 2022 : आजपासून (26 सप्टेंबर) नवरात्रोत्सवास (Navratri 2022) सुरूवात झाली आहे. त्यामुळे देशभरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अन् लॉकडाऊननंतर तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोषात नऊ दिवस देवीची आराधना केली जाणार आहे. नवरात्री म्हटलं की, केवळ भक्तच नाही तर, त्यांच्याबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीही भक्तीमध्ये तल्लीन झालेली दिसते. या खास उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, आजपासून मातेच्या नऊ रूपांची भक्तिभावे पूजा केली जाणार आहे. मनोरंजन विश्वातही नवरात्रीची विशेष धूम पाहायला मिळते. अर्थात बॉलिवूडचे असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात नवरात्रोत्सवाचा जल्लोष दाखवण्यात आला आहे.


हम दिल दे चुके सनम


चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट म्हटले की, त्यात नवरात्री स्पेशल काही नाही, असे क्वचितच घडते. चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर नवरात्रीला आलिशान शैलीत दाखवण्यासाठी संजय लीला भन्साळी प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये गुजराती पार्श्वभूमीची पात्रे दाखवली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट त्यांच्या अशाच काही चित्रपटांपैकी एक उत्कृष्ट उदाहरण आहे. यात नवरात्री, गरबा अशा जल्लोषमय वातावरणात नवरात्रीचे चित्रपट करण्यात आले आहे.


कहानी


या चित्रपटात विद्या बालनने कोलकाता येथे दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान कोलकाता येथे तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेत असलेल्या गर्भवती महिलेची भूमिका साकारली आहे. माँ दुर्गेच्या या उत्सवाचा जल्लोष देखील या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कोलकात्याच्या संस्कृतीचे अर्थात दुर्गापूजेचे चित्रण करण्यात आले आहे.


गोलियों की रासलीला राम-लीला


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातही नवरात्रीचा उत्सव साजरा करताना दाखवण्यात आला आहे. केवळ उत्वाच नाही तर, या चित्रपटात गरब्यासाठीचे एक धमाकेदार गाणे देखील आहे. या चित्रपटातील गाण्याशिवाय गरबा पूर्णच होत नाही.


लवयात्री


‘लवयात्री’ या चित्रपटामध्ये आयुष शर्मा आणि वारिना हुसैन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या उत्सवात दोन प्रेमी एकमेकांना कसे भेटतात आणि प्रेमात पडतात, या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात नवरात्रीनंतरचा त्यांचा प्रेमप्रवासही दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील 'चोगडा' हे गाणे नवरात्रीच्या उत्सवावर आधारित असून, दरवर्षी नवरात्रीत आणि गरब्यात हे गाणे ऐकू येतेच.


काय पो चे


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत, राज कुमार राव आणि अमित साध स्टारर 'काई पो चे' या चित्रपटातही नवरात्रोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे. नवरात्रीच्या माहोलात या चित्रपटातील 'शुभारंभ' या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली नवरात्री स्पेशल गाणी जबरदस्त हिट ठरली आहेत.


महत्वाच्या बातम्या :