Dev Anand Birthday: अभिनेते देव आनंद (Dev Anand) बॉलिवूडचे एक असे कलाकार होते, ज्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखो तरुणी आतुर असायच्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील या एव्हरग्रीन सुपरस्टारचा आज (26 सप्टेंबर) वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटांचे सुपरस्टार असलेल्या अभिनेते देव आनंद यांची क्रेझ समकालीन अभिनेत्यांपेक्षा नेहमीच वेगळी होती. देव आनंद हे 50-60 च्या दशकातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांची बोलण्याची शैली सर्वात अनोखी होती. भारतीय सिनेविश्वात जवळपास सहा दशके प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सदाबहार अभिनेत्या देव आनंद यांना अभिनेता होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.


26 सप्टेंबर 1923 रोजी गुरुदासपूर, पंजाब येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले, धर्मदेव पिशोरीमल आनंद उर्फ ​​देव आनंद (Dev Anand) यांनी 1942 मध्ये लाहोरमधील प्रसिद्ध सरकारी महाविद्यालयात इंग्रजी साहित्यात पदवी शिक्षण पूर्ण केले हिते. देव आनंद यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते. पण, घरच्या गरिबीमुळे त्यांना पुढील स्कीक्षण घेता आले नाही. शिक्षण घ्यायचे असेल, तर नोकरी कर, असे त्यांच्या वडिलांनी बाजावले होते.


खिशात अवघे 30 रुपये घेऊन गाठली मुंबई


यानंतर देव आनंद यांनी ठरवले की, नोकरी करायची असेल तर चित्रपटसृष्टीत नशीब आजमावूया. खिशात अवघे 30 रुपये घेऊन 1943 मध्ये ते आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईला पोहोचले. एकीकडे खिशात पैसे नव्हते, तर  दुसरीकडे राहायला जागा देखील नव्हती. देव आनंद यांनी मुंबईत आल्यावर एका रेल्वे स्टेशनजवळील स्वस्त हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली. त्याच्यासोबत त्या खोलीत आणखी तीन लोक होते जे देव आनंदप्रमाणेच चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत होते.


आर्मीसाठी केले काम


बराच काल त्यांचा संघर्ष सुरु होता. असेच बरेच दिवस निघून गेल्यावर देव आनंद यांना वाटले की, मुंबईत राहायचे असेल तर उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागेल, मग ती कोणतीही नोकरी असो. खूप मेहनतीनंतर त्यांना मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली. याठिकाणी त्यांना सैनिकांची पत्रे त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाचून सांगायची होती. मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्ये देव आनंद (Dev Anand) यांना 165 रुपये मासिक पगार मिळायचा, त्यातील 45 रुपये ते कुटुंबाच्या खर्चासाठी पाठवायचे. सुमारे एक वर्ष लष्करी खात्यात काम केल्यानंतर, ते त्यांचे मोठे भाऊ चेतन आनंद यांच्याकडे गेले. चेतन आनंद हे त्यावेळी भारतीय जन नाट्य संघाशी (IPTA) संबंधित होते. त्यांनी देव आनंद यांनाही आपल्यासोबत आयपीटीएमध्ये समाविष्ट करून घेतले.


चित्रपटसृष्टीत पदार्पण


दरम्यान, देव आनंद यांनी नाटकांमध्ये छोट्या भूमिका केल्या. अशोक कुमार यांनी ‘जिद्दी’ या चित्रपटातून देव आनंद यांना आपल्या चित्रपटात पहिला ब्रेक दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शहीद लतीफ यांनी केले होते. देव आनंद त्यांच्या रोमँटिक भूमिकांसाठी आणि जबरदस्त शैलीसाठी ओळखले जात होते. त्याच्या चेक प्रिंटेड कॅपचा येणाऱ्या पिढीवर मोठा प्रभाव पडला. बहुतेक लोक त्यांच्या शैलीची टोपी घालू लागले होते. इतकेच नव्हे तर, काळ्या रागांच्या वकिली पोशाखात ते इतके सुंदर दिसायचे की, त्यांना पाहून घायाळ झालेल्या तरुणी आत्महत्या करू लागल्या होत्या. यानंतर त्यांच्यावर हा कोट घालण्यास बंदी घालण्यात आली होती. देव आनंद (Dev Anand) यांचे ‘हरे कृष्ण हरे राम’, ‘गाईड’, ‘देश-परदेश’, ‘जॉनी मेरा’ नाम यांसारखे चित्रपट आजही लोकांच्या हृदयावर राज्य करताय.


निर्माता म्हणूनही केले काम


केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर, देव आनंद यांनी निर्माता म्हणून अनेक चित्रपट केले. या चित्रपटांमध्ये 1950 साली प्रदर्शित झालेल्या ‘ऑफिसर’ या चित्रपटाबोबतच  ‘हमसफर’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘घर क्र. 44’, ‘फुंटूश’, ‘कालापानी’, ‘काला बाजार’, ‘हम दोनो’, ‘तेरे मेरे सपने’ आणि ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या पुरस्कारांवर कोरले नाव!


देव आनंद यांना त्यांच्या अभिनय विश्वातील अमुल्य योगदानासाठी दोनदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2001मध्ये देव आनंद यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 2002 मध्ये त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.


हेही वाचा :


Dev Anand: देव आनंद यांना काळा रंगाचा कोट घालण्यास कोर्टानं घातली होती बंदी, कारण ऐकून व्हाल हैराण


Suraiya Birth Anniversary : बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात सुरैया आजन्म राहिल्या अविवाहित!