Salman Khan : पनवेलमधील फार्म हाऊसजवळील शेजाऱ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करत कोर्टाची पायरी चढलेल्या अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अंतरिम दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून वाद असताना नाहक वैयक्तिक पातळीवर आरोप होत असल्याचा सलमान आपल्या याचिकेत दावा केला होता. हे आरोप थांबवून सोशल मीडियावरील आपल्याविरोधातील पोस्ट आणि व्हिडीओ हटवण्याची सलमान खाननं मागणी केली होती.
पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळच असलेल्या भूखंडाचे मालक केतन कक्कड यांनी एका यूट्युब चॅनलच्या माध्यमातून आपली बदनामी केली. अशा प्रकारच्या अपमानकारक व्हिडिओला वेबसाईटवरून ब्लॉक करावं आणि तात्काळ हटवून टाकावं, असे अंतरिम निर्देश देण्याची विनंती करत सलमाननं मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासोबतच सदर व्हिडीओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करताना ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमाननं प्रतिवादी केल. होते. या याचिकेवर न्यायाधीश अनिल लद्दाद यांच्यासमोर सुनावणी झाली.
एनआरआय केतन क्ककड यांनी केलेले आरोप खोटे, अपमानास्पद आणि बदनामी करणारे असून त्यामुळे सलमान खान यांच्या कुटुंबाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुळात सलमान आणि कक्कडमध्ये जागेच्या अतिक्रमणावरून वाद आहे. मात्र कक्कडनं केलेले आरोप हे वैयक्तिक पातळीवरचे आहेत. चाईल्ड आणि ड्रग ट्रॅफिकिंग, बलात्कार, सुशांतसिंगची हत्या, अंडरवर्ल्डशी संबंध, लँड माफिया, दहशतवादी असे अनेक आरोप कोणताही पुरावा नसताना कक्कडनं केले असून याला धार्मिक रंगही देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सलमानने केला होता. मात्र, त्यावर निकाल देताना न्यायालयाने सलमानला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार देत प्रतिवादी कक्कडचे सोशल मीडिया अकाऊंटबंद करण्याचे अंतरिम निर्देश देण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
अंधेरी न्यायालयाकडूनही सलमानला समन्स
साल 2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी केले असून सुनावणी 5 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. या समन्समध्ये सलमानसह त्याच्या अंगरक्षक नवाज शेखला कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.
मुंबईत वांद्रे पश्चिम इथे रस्त्यावर सायकल चालवत असताना काहीजणांनी सलमानचे फोटो क्लिक घेण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान सलमानच्या बॉडीगार्डनं त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर सलमानच्या बॉडीगार्डनं वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. पांडे यांच्या तक्रारीवरून भांदवि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (धमकावणे) या कलमांतर्गत डी.बी. मार्ग पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता रेकॉर्डवरील सामग्री, पोलिसांचा सकारात्मक अहवाल आणि इतर पुरावे लक्षात घेऊन, आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचं न्यायालयाने स्पष्ट करत आरोपींना समन्स जारी केलं आहे.
संबंधित बातम्या
Salman Khan : सलमान खान हाजीर हो... भाईजानला अंधेरी न्यायालयाचं समन्स; पत्रकाराला धमकावल्याचा आरोप
Salman Khan : ‘या’ भीतीमुळे सलमान खान अजूनही अविवाहित! कारण जाणून तुम्हीही विचार कराल!
Salman Khan, Chiranjeevi : ‘आता प्रेक्षकांना मॅजिकल किक मिळणार!’, चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान खानची एण्ट्री!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha