मुंबई: अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अजय देवगण यांच्यासारख्या बॉलिवूड स्टार्सनंतर बॉलिवूडमधलं आणखी एक मोठं नाव मराठी सिनेमाच्या निर्मितीशी जोडलं गेलंय आणि ते म्हणजे संजय दत्त. संजय दत्तची पहिलीवहिली निर्मिती असलेला बाबा सिनेमा आज रिलीज झाला आहे. बाबा सिनेमाचा फक्त ट्रेलर जरी पाहिला तरी या सिनेमाची गोष्ट लक्षात येते. एखाद-दुसरी गोष्ट वगळता आपण जी अपेक्षा केलेली असते तसंच घडतं. या चित्रपटाची कथा छोटी असली तरी सगळ्यात मोठी ताकद आहे ती चित्रपटाच्या  सादरीकरणात. शब्दांवाचून कळले सारे असं हे प्रकरण आहे, ते ज्या भाषेत बोलतं ते थेट भिडतं.

जेव्हा आपण एखाद्याशी मनाने एकरुप होतो तेव्हा संवादासाठी प्रत्येक वेळी शब्दांची गरज नसते. काही गोष्टी न बोलताही अलगदपणे पोहोचतात, तो हृदयाचा संवाद असतो. तसंच काहीसं हा सिनेमा पाहाताना आपल्यात आणि या सिनेमातील पात्रांमध्ये घडतं. आपण त्या पात्रांमध्ये, कथेमध्ये गुंतून जाण्याइतपत चांगलं काम या सिनेमाच्या टीमने केलं आहे. अर्थात जास्त श्रेय जातं ते सिनेमाचा दिग्दर्शक राज गुप्ता याला.

राजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. अर्थात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आधी बरंच काम केलं आहे. सिनेमा या माध्यमाची ताकद त्याला कळली आहे, त्यामुळे शब्दांचा मारा न करताही सिनेमाची प्रत्येक फ्रेम आपल्याशी बोलत राहते असं आहे राजचं दिग्दर्शन.

यातले अनेक प्रसंग सुंदरतेने मांडले आहेत. सिनेमाच्या सुरुवातीलाच असणारा एक प्रसंग, लहानगा शंकर आपल्या आई बाबांकडे जत्रेत जाण्यासाठी हट्ट करतो. लांबून दिसणारे जत्रेतले पाळणे त्याला खुणावत असतात. आई ऐकत नाही पण बाबा मात्र त्याचा हा हट्ट पुरवायला तयार होतात. आजवर या दोघांनी त्याला समाजापासून दूर ठेवलं होतं. अर्थात त्यामागे एक कारणही आहे. जेव्हा पहिल्यांदा माधव शंकरला आपल्या सायकलवर बसवून जत्रेत घेऊन जायला निघतो तो प्रसंग खूपच बोलका आहे. शंकर पहिल्यांदाच ती दुनिया बघतोय. ते वातावरण, त्याचा गंध आणि तिथले आवाज हे सगळंच त्याच्यासाठी नवं आहे. त्यावेळी शंकरच्या चेहऱ्यावरचे भाव, कानावर पहिल्यांदाच आदळणाऱ्या आवाजाचा त्याला होणारा त्रास आणि मग आपसूकच कानावर गेलेले हात हे सगळंच खूप भारी आहे.

दिपक डोब्रियाल, नंदिता पाटकर आणि शंकरच्या भूमिकेत दिसणारा आर्यन मेघजी यांनी खरंच कमाल केली आहे. स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, जयवंत वाडकर या मंडळींनी त्यांच्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.  चित्तरंजन गिरी यांच्या कामाचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांची क्षमता अफाट आहे त्यामानानं त्यांना मिळालेली जबाबदारी साजेशी नाही. दिपक डोब्रियाल या आजवर हिंदी सिनेमांमधून झळकलेल्या नटाने त्याची खरी ताकद या सिनेमात दाखवून दिली आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की मी आजवर केलेलं काम आणि या एका सिनेमात केलेलं काम हे दोन्ही जोखायचं झाल्यास बाबा वरचढ ठरेल आणि ही गोष्ट किती खरी आहे हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येतं.

या सगळ्यात सिनेमाची खटकणारी गोष्ट म्हणजे याची लांबी. सिनेमात प्रश्न मांडून झाल्यानंतर त्याचं उत्तर मिळवण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात.  त्यांना उत्तर हवं असतं आणि पडद्यावर त्या उत्तराकडे जाणारा प्रवास सुरु असतो जो खिळवून ठेवण्यात हा चित्रपट तितका यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रेक्षागृहात चुळबूळ सुरु होते. थोडक्यात इथे दिग्दर्शकाची पकड सुटल्याची जाणीव होते. ही लांबी नक्कीच कमी करता आली असती. काही सीन्सना कात्री लावून सिनेमा आणखी आटोपशिर होऊ शकला असता.

ही एक गोष्ट सिनेमाच्या विरोधात जाणारी असली तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही हा सिनेमा पाहायला हवा, मुख्य म्हणजे सिनेमाचा शेवट. क्लायमॅक्सच्या सीनमध्ये साऱ्यांनीच कमाल रंग भरलेत. आर्यन मेघजी आणि दिपक डोब्रियाला यांनी जरा जास्तच.  थोडक्यात पटकथेमध्ये थोड्याफार त्रुटी असल्या तरी सिनेमा म्हणून 'बाबा' थेट काळजाला हात घालतो.  शब्दांविना उलगडणाऱ्या या बोलक्या कॅनव्हासला मी देतोय तीन स्टार्स.