मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा आणि पती साहिल संघा यांनी पाच वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दियानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित याबाबत माहिती दिली आहे. परस्परांच्या संमतीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे तिने म्हटले आहे.

'11 वर्षे एकमेकांसोबत घालविल्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला आहे. आम्ही जरी वेगळे होत असलो तरी आमच्यात मैत्रीचे नाते असेल. आमच्या या निर्णयाचा सगळ्यांनी आदर करावा', असे दियाने म्हटले आहे. पुढच्या आयुष्यात आमचे मार्ग वेगळे आहेत. आम्हाला समजून घेतल्याबद्दल आमच्या सर्व कुटुंबियांचे, मित्र मैत्रिणींचे आम्ही आभार मानतो. तसेच मीडियाने देखील कायम आम्हाला पाठिंबा दिला आहे. मात्र आता आम्ही विनंती करतो की आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा, असे ट्विट दियाने केले आहे.


दिया आणि साहिल यांनी मिळून एक निर्मिती संस्था सुरू केली होती. या व्यवसायात ते दोघे भागीदार होते. त्यांनी सहा वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर 2014 मध्ये दियाने साहिल संघासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्याचे हे अकरा वर्षांचे नाते आता संपुष्टात येणार आहे.

'रहेना है तेरे दिल में' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ऑक्टोबर 2014 मध्ये दिया साहिल संघासोबत विवाहबंधनात अडकली. दिल्लीत अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. अनेक सिनेमांमध्ये झळकल्यानंतर दिया मध्यंतरी सिनेक्षेत्रापासून लांब होती. बऱ्याच कालावधीनंतर संजू या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात तिने मान्यता दत्तची भूमिका साकारली होती.