मुंबई : ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) हे नाव ऐकल्याबरोबर आपल्याला आठवतं ते म्हणजे ग्लॅमर, ड्रग्जचा वाद आणि गेल्या 25 वर्षांचा अज्ञातवास. आता या नावापुढे आणखी एक ओळख निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे अंगावर भगवी वस्त्रं धारण केलेली संन्यासी. अभिनेत्री ते संन्यासीपर्यंतचा ममता कुलकर्णीचा हा प्रवास कसा झाला, आता तिचं पुढचं आयुष्य कसं असेल हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे.
अंगावर भगवी वस्त्रं, खांद्यावर झोळी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ. सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात साध्वीच्या रुपात ममता कुलकर्णी दिसतेय. एकेकाळी बॉलिवूडची अभिनेत्री असणाऱ्या ममता कुलकर्णीचा प्रवास आता सन्याशापर्यंत येऊन पोहोचला आहे. ममता कुलकर्णी आता महामंडलेश्वर झाली. ती यापुढे यामाई ममता नंदगिरी म्हणून ओळखली जाईल.
किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदवी
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला. 53 वर्षांची ममता कुलकर्णी कुंभमेळ्यातल्या किन्नर आखाड्यात पोहोचली. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींचे तिने आशीर्वाद घेतले. त्यानंतर किन्नर आखाड्यानं तिला महामंडलेश्वर पदवी देण्याचा निर्णय घेतला. ममता कुलकर्णीला चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली.
ममता कुलकर्णीनं आपल्या हातानं पिंडदान केलं. आखाड्याच्या परंपरेनुसार त्यांचा पट्टाभिषेक झाला. पट्टाभिषेक झाल्यानंतर एखाद्याला आखाड्यात मानाचं स्थान प्राप्त होतं. संन्यास दीक्षा घेताच ममता कुलकर्णीने भगवं वस्त्र धारण केलं. त्यापूर्वी ममताने आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.
ममता कुलकर्णीचा आजपर्यंतचा प्रवास
- 1992 मध्ये सुपरहिट चित्रपट तिरंगापासून ममताचं फिल्मी करियर सुरू झालं. तिनं आजवर जवळपास 40 चित्रपटांत काम केलं.
- त्यात आशिक आवारा, करण अर्जुन, वक्त हमारा है, क्रांतीवीर यासारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.
- 2002 मध्ये आलेल्या 'कभी हम कभी तुम'नंतर तिनं चित्रपटसृष्टीला अलविदा केला आणि ती केनियाला गेली.
- 2015 मध्ये तिचं नाव एका मोठ्या ड्रग्ज तस्करीमध्ये समोर आलं.
दोन हजार कोटींच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा हिस्सा असल्याचा ममतावर आरोप झाला. पण त्यानंतर मुंबई हायकोर्टानं तिला निर्दोष ठरवलं. तब्बल 25 वर्षांनंतर ती भारतात परतली आणि आता थेट चंदेरी दुनियेतली झगमगाट विसरत संन्यासीची वस्त्रं धारण केली.
ही बातमी वाचा: