Gajendra Chauhan On Adipurush: गेल्या काही दिवसांपासून ओम राऊतनं दिग्दर्शित केलेल्या आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटावर अनेक जण सोशल मीडियावर टीका करत आहेत. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेची स्टारकास्ट 'आदिपुरुष' चित्रपटाला कडाडून विरोध करत आहे. त्याचवेळी आता बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये युधिष्ठिराची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan) यांनी 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा विरोध केला आहे.
अभिनेता आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (FTII) माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्यांनी तिकीट खरेदी करूनही आदिपुरुष चित्रपट पाहिला नाही. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा हे त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला न पटण्यासारखे होते. 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर आणि शॉर्ट क्लिप पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्यालायक नाही हे त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, "मला माझ्या श्रद्धांशी तडजोड करायची नाही. मला प्रभू श्री रामांना भगवान श्री राम यांच्या रुपात."
पुढे त्यांनी सांगितलं, 'या चित्रपटामागे षडयंत्र असून चित्रपटाच्या टीमला येणाऱ्या पिढ्यांना भ्रष्ट करायचे आहे, मला टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार यांना सांगायचे आहे की, त्यांनी या सर्व गोष्टींची काळजी त्यांचे वडील गुलशन कुमार यांच्याप्रमाणेच प्रामाणिकपणे घेतली पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांनी धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे.'
मनोज मुंतशीर यांनी लिहिलेल्या 'आदिपुरुष'च्या डायलॉगमध्ये केलेल्या बदलाबाबत गजेंद्र म्हणाले की, 'नुकसान आधीच झाले असल्याने आता डायलॉग बदलण्याचा काही उपयोग नाही. लोकांनी चित्रपट नाकारून चित्रपट निर्मात्याला आधीच शिक्षा दिली आहे. ते शिक्षेस पात्र असून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या चित्रपटाला रिलीज करायचे नव्हते. संपूर्ण चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. सरकारने यावर त्वरित बंदी करावी.'
अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली 'आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे. अभिनेता देवदत्त नागेनं या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: