Lata Mangeshkar : मुंबई विद्यापीठाच्या आवारात भारतरत्न, गानकोकिळा लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) उभारण्यात येणार आहे. या महाविद्यालयाचं आणि संग्रहालयाचं डिझाइन कसं असावं यासाठी  वास्तुविशारदांसाठी खास स्पर्धा भरवण्यात येणार आहे. 


प्रथम विजेत्याला मिळणार दोन लाखांचे बक्षीस


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्धाटन झाले होते. आता या महाविद्यालयाचं आणि संग्रहालयाचं डिझाइन कसं असावं यासाठी  वास्तुविशारदांसाठी खास स्पर्धा भरवण्यात येणार आहे. प्रथम विजेत्याला दोन लाखांचे बक्षीस दिलं जाणार आहे. इमारतीच्या बांधकामाचं डिझाईन या स्पर्धेतूनच निवडण्यात येणार आहे. 


लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील सात हजार चौरस मीटर इतकी जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी कला संचालकांना हस्तांतरित केली आहे. आता या महाविद्यालयातील प्रमाणपात्र अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. तसेच महाविद्यालयाची वास्तू तयार झाल्यानंतर कलिनामध्ये महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. 


लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टींचा समावेश असेल? 


लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या महाविद्यालयाचे कामकाज व्यवस्थित व उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नेमण्यात आले असून यामध्ये उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, मयुरेश पै तसेच कला संचालक सदस्य असतील.


मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा आहे. याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एका खास समितीची स्थापना करण्यात आली होती.


लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. आता त्यांच्या निधनानंतर लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) सुरू करण्यात येत आहे. 



संबंधित बातम्या


Lata Mangeshkar : आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय लता मंगेशकरांच्या जयंती दिनी सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश