मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) सुरू करण्यात येणार आहे. हे संगीत महाविद्यालय लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दिले आहेत.
संगीत महाविद्यालय सुरू करावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज (16 ऑगस्ट) बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले,"जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे".
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा आहे. याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एका खास समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही आज पार पडलेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास जागे अभावी अडचण येऊ नये यासाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 28 सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संबंधित बातम्या