Lata Deenanath Mangeshkar Award 2023 : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar Award) हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना लता दीदींच्या आठवणीत आशा भोसले भावूक झालेल्या दिसून आल्या.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लतादीदींच्या नावानं देण्यात आलेल्या मानाच्या पुरस्काराचं यंदाचं केवळ दुसरं वर्ष आहे. याच सोहळ्यात भारतीय संगीतातल्या योगदानासाठी पंकज उधास यांना, तर अभिनयक्षेत्रातल्या योगदानासाठी विद्या बालन आणि प्रसाद ओक यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम मराठी नाटकासाठीचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 'नियम व अटी लागू' या नाटकाला देण्यात आला.
पंडित हृदयनाथ मंगेशकर हे 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. 'लता दीनानाथ मंगेशकर' या पुरस्काराआधी आशा भोसले यांना राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराबद्दल जाणून घ्या... (Lata Deenanath Mangeshkar Award Details)
दरवर्षी दीनानाथ स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक, साहित्यिक, कलाकार, सेवाभावी संस्था आदींना मास्टर दीनानाथजींच्या स्मृतिप्रित्यर्थ पारितोषिके प्रदान केली जातात. गेल्या 33 वर्षांपासून नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जात आहे.
प्रसाद ओकने वडिलांना समर्पित केला 'दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार'
प्रसाक ओकने मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खास पोस्ट लिहिली होती. त्याने लिहिलं होतं,"यावर्षीचा 'मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार' मला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी आणि धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीमचे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा आणि पं.हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतश: ऋषी आहे. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो".
संबंधित बातम्या