Laapataa Ladies Enter For Oscars: किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या सिनेमाची ऑस्कर पुरस्कारांसाठी (Oskar Award 2025) निवड करण्यात आली आहे. किरण रावचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे आणि तिच्या पहिल्याच सिनेमाची दखल ऑस्करसाठी घेतली आहे. दरम्यान, या सिनेमाची कथा ही प्रत्येकालाच भावली. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या कथेचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. बॉक्स ऑफिसवरही चांगल यश या सिनेमानं मिळवलं. दरम्यान, यानंतर सिनेमाची दिग्दर्शिका किरण रावने ऑस्कर टीमचे, तिच्या सर्व टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. एकीकडे लापता लेडीजला ऑस्करसाठी धाडल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे काहींनी टीकेची झोड देखील उठवली आहे.
सध्या देशात एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट कोणत्याही मोठ्या स्टारकास्टचा नाहीतर, काही नव्या चेहऱ्यांचा आहे, ज्यांनी किरण राव यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आणि थेट ऑस्करमध्ये प्रवेश केला. 'लापता लेडीज' असं या चित्रपटाचं नाव आहे. किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर 2025 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवलं जात आहे.
भारतीय फिल्म फेडरेशननं सोमवारी जाहीर केलं की 'लापता लेडीज' या चित्रपटाची 2025 मध्ये ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय फिल्म फेडरेशनच्या समितीनं 29 चित्रपटांच्या यादीतून 'लापता लेडीज'ची ऑस्कर 2025 साठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड केली. या 29 चित्रपटांच्या यादीत 'अट्टम', 'कल्की 2898 एडी' आणि 'ॲनिमल' या चित्रपटांचाही समावेश आहे.
ऑस्करसाठी 'लापता लेडीज'च का?
आसामचे फिल्ममेकर आणि डायरेक्टर जाहनू बरुआ यांनी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरी टीमला लीड केलं. जाहनू बरुआ यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला. त्यांनी ऑस्करसाठी 'लापता लेडीज'चीच निवड का करण्यात आली, याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
...म्हणूनच ऑस्करसाठी 'लापता लेडीज'ची निवड झाली
ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशासाठी फक्त 'लापता लेडीज' का निवडली गेली, असं मुलाखतीदरम्यान जाहनू यांना विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले की, "ज्युरींना प्रत्येक आघाडीवर भारताचं प्रतिनिधित्व करणारा योग्य चित्रपट पाहावा लागेल. विशेषत: त्या चित्रपटात भारताची समाजव्यवस्था आणि त्याचं स्वरूप दाखवलं पाहिजे. भारतीयत्व खूप महत्वाचं आहे आणि लापता लेडीजनं या आघाडीवर खूप चांगलं काम केलं आहे."
29 नामांकनांच्या यादीतून 'लापता लेडीज'ची बाजी
जाहनू बरुआ पुढे म्हणाले की, "भारताचं प्रतिनिधित्व करणारा सर्वात अचूक चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवला जाणं महत्त्वाचं आहे. 29 नामांकन मिळालेल्या चित्रपटांपेक्षाही चांगला चित्रपट असू शकतो. पण ज्युरी त्यांना दिलेल्या यादीतूनच निवडू शकतात, बरोबर ना? अशा परिस्थितीत, ज्युरी टीमला लापता लेडीज हा चित्रपट जेतेपदासाठी योग्य वाटला.”
जाहनू बरुआ यांच्या नेतृत्वाखालील 13 सदस्यीय समितीनं एकमतानं किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाची अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली आहे.
लापता लेडीजची नेमकी कहाणी काय?
या चित्रपटात प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांसारखे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'लापता लेडीज' हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. लग्नानंतर बेपत्ता झालेल्या दोन महिलांची ही कथा आहे. 2001 मध्ये, निर्मल प्रदेश नावाच्या काल्पनिक राज्यात, फुल आणि पुष्पा या दोन नववधू आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान चुकून त्यांची अदलाबदल होते. एकीला वेगळाच नवरा स्वतःची नववधू म्हणून सोबत घेऊन जातो, तर दुसरी रेल्वे स्टेशनवरच आपल्या नवऱ्याची वाट पाहात थांबते. पोलीस अधिकारी किशन या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतात. त्यानंतर खरी नववधू शोधण्यासाठी जो ड्रामा होतो, तो पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट जिओ स्टुडिओनं प्रस्तुत केला आहे आणि आमिर खान प्रॉडक्शन, किरण रावच्या किंडलिंग प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :