मुंबई : कोलकातामधील रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या निघृण कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. 31 वर्षीय महिला डॉक्टरसोबत माणुसकीला काळिमा फासणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या सेमिनॉर हॉलमधेच पीडितेवर आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर संतापाची लाट उसळली आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरले असून न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. या घृणास्पद घटनेवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोलकाता निर्भया कांडवर बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रतिक्रिया
कोलकाता बलात्कार प्रकरणावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) हृदय पिळवटून टाकणाऱ्या कवितेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, तर स्वरा भास्कर (Swara Bhaskar), आलिया भट (Alia Bhatt) आणि रिचा चढ्ढासह (Richa Chadha) विजय वर्मानेही पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आलिया भटची इंस्टाग्राम पोस्ट
अभिनेत्री आलिया भट इंस्टाग्राम पोस्ट करत लिहिलं आहे, "आणखी एक बलात्कार. महिला कुठेही सुरक्षित नाहीत याची जाणीव करण्याचा आणखी एक दिवस." भारतात दहा वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणाची आठवण करून देताना आलियाने म्हटलंय, "निर्भया प्रकरणाला एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, तरीही काहीही बदल झालेला नाही याची आठवण करून देणारी ही आणखी एक अत्याचाराची घटना आहे."
ऋचा चढ्ढाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे केली 'ही' मागणी
अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने तिच्या अधिकृत X मिडिया अकाऊंटवरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. ऋचा चढ्ढाने लिहिलं आहे, "या देशातील महिलांना तुमच्याकडून निष्पक्ष तपास आणि न्यायाची अपेक्षा आहे. सध्या मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या तुम्ही एकमेव महिला आहात."
स्वरा भास्करचं ट्वीट
स्वरा भास्करने या प्रकरणावर ट्वीट करत मनातील खदखद व्यक्त करत लिहिलं आहे, कोलकाता येथील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या ही भयावह घटना आहे आणि एक समाज म्हणून आपण महिलांशी कसे वागतो, याची कठोर आठवण करून देणारी आहे, मग ते गरज पडली तर आपल्याला उपचार देतील आणि वाचवतील! तसेच रुग्णालयातील अधिकारी आणि पायाभूत सुविधांची यामध्ये घोर चूक आहे! भारत हा महिलांसाठी असलेला देश नाही, याची ही वेदनादायक आठवण आहे. आरोपींवर खटला चालवावा आणि लवकरात लवकर न्याय मिळावा. आपल्या देशातील आंदोलक डॉक्टरांशी एकजूट!
अभिनेत्री परिणीती चोप्रानेही यावर एक पोस्ट करत म्हटलंय, जर लोकांना कोलकाता बलात्कार प्रकरणाची बातमी वाचून त्रास होत असेल, तर कल्पना करा की, त्या महिला डॉक्टरची काय अवस्था झाली असेल. अत्यंत घृणास्पद. परिणीतीने आरोपींना फाशी देण्याचीही मागणी केली आहे.
अभिनेता विजय वर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून लिहिले की, "किमान आमच्या रक्षकांचे रक्षण करा." विजयने ‘डॉक्टर सध्या काय बोलतात याकडे आपण लक्ष का द्यावे’ अशी पोस्टही टाकली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :