Independence Day 2024 Patriotic Movies :  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनासोबत लाँग वीकेंडही आला आहे.  या स्वातंत्र्य दिनी तुम्ही घरी ओटीटीवर मुलांसोबत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे चित्रपट (Bollywood Movies Based On Indian Freedom Struggle) पाहू शकता. हे चित्रपट चांगलेच गाजले होते. 


सरदार उधम Sardar Udham


भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक सरदार उधम यांच्यावर आधारीत हा चित्रपट आहे. अभिनेता विकी कौशल याने या सरदार उधम यांची भूमिका साकारली होती. सुजित सरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. अमृतसरमधील 1919 मधील जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार असणाऱ्या मायकल ओड्वायर या ब्रिटीश अधिकाऱ्याची सरदार उधम सिंह यांनी लंडनमध्ये हत्या केली होती. या चित्रपटाचे समीक्षक, अभ्यासकांनी कौतुक केले होते. 


द लिजेंड ऑफ भगत सिंह  The Legend of Bhagat Singh


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वैचारिक आणि कृतीशील योगदान देणारा आणि वयाच्या 23 व्या वर्षी फासावर जाणारा क्रांतिकारक भगत सिंह याच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. राजकुमार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर, अजय देवगण याने भगत सिंह यांची भूमिका साकारली होती. भगत सिंह यांची जडणघडण, त्यांचा वैचारिक कल, त्यांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची भूमिका हे चित्रपटात अधिक सविस्तरपणे आल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिली. चित्रपटातील धारदार संवाद, देशप्रेमाची भावना जागृत करणारी गीते यामुळे आजही हा चित्रपट लोकप्रिय आहे. 



गांधी (1982) Gandhi 


भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर बेतलेला हा हॉलिवूडपट आहे.  रिचर्ड ॲटनबरो यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती केली होती. बेन किंग्सले यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती.कस्तुरबा गांधी यांची भूमिका रोहिणी हट्टंगडी यांनी साकारली. 


चित्रपटात गांधींच्या जीवनाचा 1893 मधील एका निर्णायक क्षणापासून समावेश आहे. याच वर्षी त्यांना  फक्त गोऱ्यांच्या डब्यात प्रवेश केल्याने बाहेर फेकण्यात आले होते. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्यलढा ते 1948 मध्ये त्यांची हत्या या पर्यंतचा प्रवास या चित्रपटात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाचे कौतुक झाले. महात्मा गांधी यांचा सर्वोत्तम जीवनपट मांडणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. 


सरदार (1993) Sardar 


भारताचे लोहपुरुष अशी ओळख असणारे, महान स्वातंत्र्यसैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील चरित्रात्मक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहता यांनी केले आहे. विजय तेंडुलकर आणि हृदय लानी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. अभिनेते परेश रावल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती. 


चित्रपटाची सुरुवात तरुण सरदार पटेल आपल्या मित्रांसोबत खेळत असताना महात्मा गांधी आणि त्यांच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या धोरणांची खिल्ली उडवण्यापासून होते. तथापि, जेव्हा त्यांच्या बंधूंनी त्यांची महात्मा गांधींशी ओळख करून दिली तेव्हा त्यांचे विचार बदलले. महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रेरित झालेले सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. चित्रपटात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. 


चित्तगाव (2012) Chittagong


भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या चित्तगाव कटावर आणि त्यात सहभागी असणाऱ्या क्रांतीकारकांवर हा चित्रपट आधारीत आहे. सूर्यसेन हे या कटाचे सूत्रधार होते. अंबिका चक्रवर्ती, निर्मल सेन, गणेश घोष, प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्त यासारखे तरुण क्रांतिकारक यात सहभागी होते. 


बेदग्रता पेन यांनी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात मनोज वाजपेयी, विजय वर्मा, नवाजुद्दीन सिद्दीकी, जयदीप अहलावत, देविना सेठ आदीसह इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. मनोज वाजपेयी यांनी क्रांतिकारक मास्टर सूर्य सेन यांची भूमिका साकारली. चित्रपटाची कथा 14 वर्षांचा झुंकू या मुलापासून सुरू होते.  


नेताजी सुभाषचंद्र बोस : द फॉरगटन हिरो Netaji Subhas Chandra Bose : The Forgotten Hero (2004) 


भारतीय स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक वळण देणारे, महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतला आहे. श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर, सचिन खेडेकर यांनी नेताजींची भूमिका साकारली होती. त्याशिवाय, कुलभूषण खरबंदा, रजित कपूर, आरिफ झकेरिया आणि दिव्या दत्ता आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढ्यात घेतलेला सहभाग, काँग्रेसमधील भूमिका, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व आदी घटना ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत.