Vedaa Review : क्रिकेटमध्ये अनेकदा चांगल्या सुरुवातीनंतर फलंदाज लवकर बाद होतो. अपेक्षा वाढल्या असताना त्या अपेक्षांचा भंग होतो. असंच काहीसं 'वेदा' सोबत झालंय.  चांगला ट्रेलर, चांगली संकल्पना, चित्रपटाचा मध्यंतरापूर्वीचा भागही चांगला आहे. पण, वेदा अपेक्षा पूर्ण करताना दिसत नाही. 


चित्रपटाची कथा काय?


चित्रपटाची कथा जाती व्यवस्थेभोवती फिरते.  ही गोष्ट आहे राजस्थानच्या बाडमेरची, जिथे 150 गावांचा प्रमुख हा कायदा ठरवतो. अनुसूचित जातीतील मुलाचा जीव हा सवर्ण जातीतील मुलीवर जडतो. त्यानंतर सुरू होतो तो रक्तरंजित खेळ. वेदा ही मागासवर्गीय जातीची पार्श्वभूमी असलेली मुलगी आहे. वेदाला बॉक्सिंगमध्ये करिअर करायचे आहे. लष्करातील माजी जवान अभिमन्यू  अर्थात जॉन तिची मदत करतो. वेदाच्या भावाच्या प्रेम प्रकरणाचा त्यांच्या सगळ्या कुटुंबाला त्रास होतो. पुढे काय होते, वेदा आणि तिचे कुटुंबीय या सगळ्या प्रकरणाला कसे सामोरे जातात? कथेत कोणत्या घडामोडी घडतात? हे जाणून घ्यायला चित्रपट पाहावा लागेल. 


कसा आहे चित्रपट?


या चित्रपटाच्या केंद्रस्थानी शर्वरी वाघ आहे. चित्रपटाची सुरुवात दमदार आहे. जातीय भेदभावाच्या अशी काही दृष्ये आहेत, ज्यांचा तुम्हाला धक्का बसू शकतो.  हा फक्त अॅक्शनपट नाही तर इतरही त्यात खूप काही गोष्टी आहेत. मध्यंतरापूर्वीचा चित्रपट चांगला जमला आहे. मात्र, उत्तरार्ध हा फारसा रंजक नाही. आपल्या मनातील अंदाजाप्रमाणेच घटना घडत जातात. चित्रपट अपेक्षाभंग करत असल्याचे आपल्याला जाणवत राहते. चित्रपटात अॅक्शनचा डोस कमी करत इमोशनचा डोस वाढवला जातो. चित्रपटाच्या पटकथेवर आणखी लक्ष दिले असते तर  आणखी चांगला चित्रपट झाला असता. 


कलाकारांचा अभिनय कसा आहे?


शर्वरी हीच चित्रपटाचा प्राण आहे. तिने कमालीची भूमिका साकारली आहे. स्थानिक बोली भाषा असो किंवा देहबोली असो, तिने चांगलंच काम केले आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धातही तिने आपली छाप सोडली आहे. शर्वरीने या वर्षात वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. त्यात तिने चांगलेच काम केले आहे. येणाऱ्या काळात ती आघाडीची अभिनेत्री होऊ शकते. 


जॉन अब्राहमचे काम चांगले आहे. जॉनने आपल्या व्यक्तीरेखेला न्याय दिला आहे. अॅक्शनमध्ये जॉन आपली छाप सोडतो. अभिषेक बॅनर्जीने देखील खलनायकी भूमिकेसाठी जीव ओतून काम केले आहे. आशिष विद्यार्थी यांनी पुन्हा एकदा आपला खणखणीत अभिनय दाखवून दिला आहे. क्षितिज चौहाननेही चांगले काम केले आहे. तमन्ना भाटिया पाहुणी कलाकार आहे.


दिग्दर्शन - 


निखील आडवाणीचे  चांगले दिग्दर्शन ठीकठाक आहे. चांगल्या सुरुवातीनंतर चित्रपट आणखी रंगवता आला असता. पण, त्यात तो कमी पडला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आणखी मेहनत घेतली असती तर चांगला चित्रपट झाला असता.


एकूणच काय तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही.शर्वरी आणि चित्रपटाच्या विषयाला अतिरिक्त गुण द्यायला हवे.