Kishore Kumar : मनोरंजन विश्वातील एक अजरामर आवाज म्हणजे किशोर कुमार (Kishore Kumar). आज किशोर कुमार यांची पुण्यतिथी आहे. किशोर कुमार यांनी वयाच्या अवघ्या 57व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. आपल्या आवाजानेच नव्हे तर अभिनयाने देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या किशोर कुमार यांच्या चाहत्यांच्या यादीत आजही घट झालेली नाही. एक उत्तम गायक असण्यासोबतच किशोर कुमार हे लेखक, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक देखील होते. किशोर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं असलं, तरी प्रेक्षकांना ते गायक म्हणून जास्त लक्षात राहिले.


पार्श्वगायनासाठी 8 फिल्मफेअर पुरस्कार जिंकणाऱ्या या अप्रतिम गायकाने जवळपास 80हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी संगीताचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते, पण ही कला त्यांना वरदान म्हणून मिळाली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली. खंडवा येथे जन्मलेल्या किशोर कुमार यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश सरकारने 1997 मध्ये 'किशोर कुमार पुरस्कार' सुरू केला आहे.


किशोर कुमार यांचे खरे नाव माहितीये का?


किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात झाला. किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार होते. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती, फक्त त्यांच्या किशोर कुमार या नावाने.. किशोर कुमार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मस्तमौला व्यक्ती होते. किशोर कुमार आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी लोकांच्या हृदयात कायम जिवंत आहेत.


संगीताचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण नाही!


किशोर कुमार यांनी चित्रपटात येण्यापूर्वीच संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते. किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्व भाषांमध्ये तब्बल 2000हून अधिक गाणी गायली आहेत. बालपणी त्यांना आवाज फारसा सुरेल नव्हता. मात्र, मनोरंजन विश्वात पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजाची जादू सर्वदूर पसरवली. ‘शिकारी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1948 मध्ये आलेल्या 'बॉम्बे टॉकीज' चित्रपटात किशोर कुमार यांनी पार्श्वगायक म्हणून पहिले गाणे गायले होते, ज्यामध्ये ते देवानंद यांचा आवाज बनले होते.


दुहेरी आवाजात गायले गाणे!


'हाफ तिकीट' चित्रपटातील 'आके सीधे लगी दिल पे जैसी कटारिया' या गाण्याचा हा किस्सा खूप प्रसिद्ध आहे. चित्रपटातील हे गाणे किशोर कुमार (Kishore Kumar) आणि लता मंगेशकर यांना एकत्र रेकॉर्ड करायचे होते. परंतु, काही कारणास्तव लतादीदी हे गाणे रेकॉर्डिंग करू शकल्या नाहीत. यावेळी किशोर कुमार म्हणाले की, मी एकदा हे गाणे दोन आवाजात गाण्याचा प्रयत्न करून पाहतो. त्यानंतर त्यांनी हे गाणे पुरुष आणि महिला अशा दोन्ही आवाजात रेकॉर्ड केले. एका टेकमध्ये फायनल झालेले हे गाणे सुपरहिट झाले.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 13 october: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!