(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : कंगना रणौतचा सवाल, सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान, त्यांना भारतात...
Kangana Ranaut : कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले.
Kangana Ranaut : भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi Lok Sabha) लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाच्या उमेदवारीवर टीका करताना काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर आता कंगनाने पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे सूर्य असून विरोधी पक्ष नेते मेणबत्तीच असल्याचे कंगनाने म्हटले. कंगनाने काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले असल्याच्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे तिने म्हटले.
'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने म्हटले की, विरोधी पक्षातील नेते हे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात बुडाले आहेत. हे सगळे एकत्र येऊ शकत नाही. तुम्ही त्यांची पंतप्रधान मोदींसोबत तुलना केल्यास पीएम मोदी हे सूर्य आहे तर विरोधी पक्ष नेते मेणबत्तीदेखील नाही असेही कंगनाने म्हटले.
नेताजी बोस यांना पंतप्रधान का केले नाही?
कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले. कंगनाने म्हटले की, एका व्यक्तीने आपले रक्त सांडून स्वातंत्र्य दिले. जर्मनी ते जपानपर्यंत स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यांना देशाचे पंतप्रधान का केले नाही, अखेर ते कुठे अचानक अदृश्य झाले असा सवाल कंगनाने केला. जे तुरुंगात बसून टीव्ही पाहायचे ते सरकारमध्ये आले. आझाद हिंद फौजेच्या जवानांना कारवाईला सामोरे जावे लागले, अनेकजणांना गायब करण्यात आले असल्याचा दावाही कंगनाने केला.
कंगनाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर कंगनाचे जुने ट्वीट व्हायरल होत आहे. एकदा कंगनाने आपल्या देशाला 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाले असल्याचे म्हटले. याबाबत निगडीत असलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने म्हटले की, लोक मला अशा काही गोष्टींवर ट्रोल करू शकतात.अशा लोकांनी माझ्यासोबत येऊन चर्चा कराव आणि सांगावे मी काय चुकीचे बोलले? स्वातंत्र्य म्हणजे तुरुंगातून बाहेर येण्यापर्यंत मर्यादित आहे का? आधीच्या सरकारने कोणतीही नवीन न्याय व्यवस्था लागू केली नाही. आपल्याला विचारसरणीपासून स्वातंत्र्य मिळाले नाही. विचार करण्याचेही स्वातंत्र्य मिळाले नाही. आपले प्रतिनिधीत्व करणारी लोक निवडण्याचेही स्वातंत्र्य मिळाले नाही. इतकंच नव्हे तर धार्मिक स्वातंत्र्यदेखील मिळाले नसल्याचे कंगनाने म्हटले.
...म्हणून राजकारणात उतरलीस का?
चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात आलीस का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी तिने म्हटले की, शाहरुखचे चित्रपट 10 वर्ष फ्लॉप झाली. मग, पठाण सुपरहिट झाला. माझेही 7-8 चित्रपट फ्लॉप झाले, मग क्वीन चित्रपट हिट झाला. मग, त्याच्या 3-4 वर्षांनी मणिकर्निका चित्रपट हिट झाला. आता एर्मजन्सी प्रदर्शित होणार आहे, कदाचित हा सगळ्यात मोठा हिट चित्रपट असू शकतो, असेही तिने म्हटले. सध्या काळ बदलला असून ओटीटीचा जमाना आहे. कलाकारांकडे आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे.
सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टवर काय म्हणाली कंगना?
कंगनाने म्हटले की, आपण महिला सशक्तीकरणावर काम करतो. मंडी लोकसभा मतदारसंघाला अशा प्रकारे संबोधित करणे दुखावणारे आहे. मंडी हे नाव महर्षी मांडव यांच्या नावावर ठेवण्यात आले असल्याचे तिने म्हटले. हिमाचल मधील जनता त्या टिप्पणीने नाराज झाली असल्याचे तिने म्हटले.