मुंबई: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या कंगना रनौतच्या ट्वीटवर हल्ली प्रत्येकाचं लक्ष असतं. जिथे जिथे शक्य असेल तिथे ती बोलू लागते. चित्रिकरणं चालू असतात तेव्हा तिचा ट्विटरवरचा वावर कमी होतो. पण आता देशात कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा वाढली आहे. ती पाहता चित्रिकरणं बंद झाली आहे. याचा थेट परिणाम आता ट्विटरवर होऊ लागला आहे. कंगना पुन्हा एकदा ट्विटरवर बरळू लागली आहे. 


पश्चिम बंगालच्या निवडणुकांबद्दल तर ती बोलते आहेच. पश्चिम बंगालमध्ये कसा हिंसाचार झाला..आसाम, पुद्दुचेरीमध्ये कशा शांततेत निवडणुका पार पडल्या आदी अनेक गोष्टी ती सांगते आहेच. पण त्याही पलिकडे ती चर्चेत आली आहे ते ऑक्सिजनबद्दल तिने केलेल्या तीन ट्वीटमुळे. गेल्या काही दिवसांपासून देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजनवाचून लोक तडफडू लागले आहेत. हे लक्षात घेता, देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन करून ते रुग्णांपर्यंत पोचवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. असं असताना कंगनाने मात्र एक नवाच बेसूर आळवला आहे. 


तिने केलेली ट्वीट्स अशी. प्रत्येकजण आता जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट उभे करतो आहे. त्यातून टनावारी ऑक्सिजन मिळवला जाणार आहे. एकीकडे पर्यावरणातून आपण ऑक्सिजन काढणार आहोत. त्याची भरपाई आपण करणार कशी? आपण आपल्या यापूर्वी केलेल्या चुकांमधून काहीच शिकलेलो नाही. 


आपल्या दुसऱ्याच ट्वीटमध्ये ती म्हणते की, ज्यांना हा ऑक्सिजन दिला जाणार आहे, त्यांनी पर्यावरणासाठी प्रतिज्ञा करायला हवी. ती आपल्या ट्वीटमध्ये म्हणते की, माणसासाठी ऑक्सिजन बनवण्याचं सरकार ठरवतं आहे, त्याचवेळी सरकारने निसर्गासाठीही काही योजना जाहीर कराव्यात. जी मंडळी हा ऑक्सिजन घेणार आहेत, त्यांनी वातावरणातली हवा आणखी शुद्ध होण्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञाच करायला हवी. निसर्गाकडून घेतलेलं त्याला परत न देणारे आपण, असा उच्छाद आणखी किती काळ मांडणार आहोत. 


आपल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये तिने सबंध मानवजातीला दम भरला आहे. ती म्हणते की, पृथ्वीवरून सूक्ष्म किटकांची जमात जरी नाहीशी झाली तरी पृथ्वीवर त्याचा परिणाम होतो. पण या पृथ्वीतलावरून मानव जात नाहीशी झाली, तर उलट होईल, पृथ्वी बहरेल. तुम्ही जर पृथ्वीवर प्रेम करत नसाल, तिला माता मानत नसाल तर तुमचं या पृथ्वीतलावरचं अस्तित्व व्यर्थ आहे.  


कंगनाचं निसर्ग प्रेम समजण्यासारखं आहे. उलट झाडं तर लावायला हवीतच. पण वृक्ष लागवड सगळ्यांनी करायची गोष्ट आहे. शिवाय, ज्या प्लांटमधून तयार झालेला ऑक्सिजन ज्यांनी घेतला आहे, त्यांनीच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी असं अजिबात नाही. ती आपल्या सगळ्यांची आहे. पण हा सगळा पोटशूळ कुठून येतोय हे न कळण्याइतपत आपण दूधखुळे नाही. पर्यावरणाचं रक्षण महत्वाचं आहेच. पण सध्या भारतात उद्भवलेली परिस्थिती पाहता रुग्णांचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे अशा अर्थाच्या कमेंट्सही तिच्या ट्वीटवर आलेल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या: