Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे ईडीच्या रडारवर आलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez) हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही काळापूर्वी पीएमएलए कायद्यांतर्गत जॅकलिनची 7 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली होती आणि आता ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पासपोर्टही जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.


जॅकलिन फर्नांडिसने 15 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. अभिनेत्रीने कारण देताना सांगितले की, 2022च्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तिला अबुधाबीला जायचे आहे. तिने न्यायालयाकडे अबुधाबी, तसेच फ्रान्स आणि नेपाळला जाण्याचीही परवानगी मागितली आहे. पटियाला हाऊस कोर्ट 18 मे रोजी तिच्या या अर्जावर सुनावणी करणार आहे. पासपोर्ट जप्त झाल्यानंतर जॅकलिन यापुढे देशाबाहेर जाऊ शकणार नाहीय. ईडीने यापूर्वीच लुक आउट परिपत्रक जारी केले आहे.


नेमकं प्रकरण काय?


‘महाठग’ सुकेशवर 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असून, त्याच्यासोबत जॅकलिनचे संबंध समोर आले आहेत. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने खंडणीमार्फत कमवलेला पैसा वापरून जॅकलिनला 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने जॅकलिनच्या बहिणीला दीड लाख अमेरिकन डॉलर्सचे कर्ज देण्यासोबतच, तिचा भाऊ वॉरनच्या खात्यात तब्बल 15 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. याशिवाय सुकेशने अभिनेत्रीला एक घोडा देखील गिफ्ट केला होता.


याच 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव जोडले गेले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.


ईडीने तपासादरम्यान जॅकलिनचे जबाब नोंदवले होते. त्याचवेळी जॅकलिनने ईडीला सांगितले होते की, सुकेशने माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि मला लाखो रुपयांच्या घोड्यासह महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याशिवाय सुकेशने जॅकलिनच्या आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्चही उचलला होता. जॅकलिन आणि सुकेशचे अनेक फोटोही समोर आले होते.


हेही वाचा :