Randeep Hooda Birthday : बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. रणदीप हुडा याचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणामध्ये झाला. आपल्या मुलाने डॉक्टर बनावे अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा होती. पण, त्याला असलेल्या अभिनयाच्या वेडापायी ते शक्य होऊ शकले नाही. अभिनयासोबतच रणदीप हुडाला फोटोग्राफी आणि घोडेस्वारीचाही शौक आहे. रणदीप हुडाने 2001 मध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. एकापेक्षा एक हिट चित्रपट देत त्याने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.


तब्बल 32 दमदार चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रणदीपने बॉलिवूडमध्ये अनेक हटक्या विषयांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रणदीप मागील 20 वर्षांहून अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 2001मध्ये आलेला ‘मान्सून वेडिंग’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने एनआरआयची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या रणदीपचा हा प्रवास खूपच फिल्मी आहे.


उच्च शिक्षणासाठी गाठले परदेश


वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी रणदीपला शिक्षणासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये पावण्यात आले होते. सोनीपतमधील बोर्डिंग स्कूलमधून त्याने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीतील प्रतिष्ठित आरके पुरममध्ये त्याने शिक्षण घेतले. यानंतर तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात गेला. तिथे त्याने मार्केटिंग आणि मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. ऑस्ट्रेलियात शिकत असताना खर्च भागवण्यासाठी त्याने चायनीज रेस्टॉरंटमध्ये काम केले, कार धुण्याचे काम केले. इतकेच नाही तर, टॅक्सीही चालवली. 2 वर्षानंतर तो भारतात परतला आणि एअरलाइन्सच्या मार्केटिंग विभागात नोकरीला लागला.


‘या’ चित्रपटाने बदललं आयुष्य!


पहिल्या चित्रपटानंतर रणदीपने अनेक भूमिका केल्या. पण, 2005मध्ये आलेल्या ‘डी’ या चित्रपटाने रणदीपला खरी ओळख मिळवून दिली. हा चित्रपट रणदीपच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. दाऊदच्या व्यक्तिरेखेवर बनलेल्या या चित्रपटाने रणदीपला स्टार बनवले. त्यानंतर रणदीपने कधीही मागे वळून पाहिले नाही. रणदीपने आतापर्यंत 32हून अधिक चित्रपट केले आहेत. आता तो बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.


उत्कृष्ट आणि प्रोफेशनल घोडेस्वार!


अभिनेता असण्याबरोबरच रणदीप हुडा हा एक उत्कृष्ट आणि प्रोफेशनल घोडेस्वार देखील आहे. तो पोलो सारख्या रेस शोमध्ये भाग देखील घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार रणदीप हुडाकडे जवळपास 6 घोडे आहेत. अशा काही घोडेस्वारीच्या स्पर्धांमध्ये त्याने पदकेही जिंकली आहेत.


हेही वाचा :


PHOTO: ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक; रणदीपचा दुसरा बायोपिक!


रणदीप हुडाच्या 'खर्च करोड'ची यूट्यूबवर धूम