TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; अद्याप शुद्धीवर नाही, जवळच्या नातेवाईकांची एबीपी न्यूजला माहिती


राजू श्रीवास्तव यांच्या जवळच्या नातेवाईकांनी एबीपी न्यूजला माहिती दिली आहे की,"राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांच्या मेंदूला आलेली सूज अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजूच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह चाहतेदेखील प्रार्थना करत आहेत". 


'बस बाई बस'च्या आगामी भागात क्रांती रेडकर अन् भरत जाधव होणार सहभागी


'बस बाई बस' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात क्रांती रेडकर आणि भरत जाधव सहभागी होणार आहे.   


'गॉसीप आणि बरंच काही' मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती!


मालिका विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. मायबाप प्रेक्षक पडद्यावरील मालिकांवर तसंच कलाकारांवर प्रेम करतात. मालिकांच्या पडद्यामागचं वातावरणं कसं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. येत्या 21 ऑगस्टपासून दर रविवारी 'गॉसीप आणि बरंच काही' या मालिकेच्या माध्यमातून मालिकेतल्या कलाकारांची पडद्यामागची धमाल, मजा, मस्ती आणि गप्पा हे सारं प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे.


खिलाडी कुमारच्या 'कठपुतली'चा टीझर आऊट


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र कमी पडला आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होणारा येत्या वर्षातला हा तिसरा सिनेमा आहे. अशातच आज खिलाडी कुमारच्या आगामी 'कठपुतली' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला रणबीरचा 'शमशेरा' ओटीटीवर रिलीज


 बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने गेल्या अनेक दिवसांनी 'शमशेरा' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमात रणबीरसोबत वाणी कपूर, संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. आता सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.


छोट्या पडद्यावरील अभिनेत्री नुपुर अलंकारने घेतला संन्यास


नुपुर अलंकार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या 27 वर्षांपासून नुपुर मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. पण आता तिने मनोरंजनसृष्टीकडे पाठ फिरवली आहे. तसेच तिने संन्यासदेखील घेतला आहे. 


‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नवी गूढ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!


आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार, या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण, लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात. त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.


अनुराग अन् तापसीची इच्छा नेटकऱ्यांनी केली पूर्ण; ट्विटरवर बॉयकॉट दोबारा होतंय ट्रेंड


अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा दोबारा हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाला बॉयकॉट करा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तापसी आणि अनुराग यांनी केली होती. अनुराग आणि तापसी यांच्या ही ईच्छा आता नेटकरी पूर्ण करत आहेत. सध्या बॉयकॉट दोबारा हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'पोन्नियिन सेल्वन' सिनेमातील Chola Chola गाणं आऊट


बाहुबली नंतर 'पोन्नियिन सेल्वन' या दाक्षिणात्य सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. या सिनेमाचे पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता सिनेमातील 'चोला-चोला' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 


'फक्त मराठी सिने सन्मान'मध्ये अशोक मामांचा होणार विशेष सन्मान


गेल्या 50 वर्षांहून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमाविश्वात आपल्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयानं अशोक सराफ या व्यक्तिमत्वानं स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलं आहे. अशोक मामांनी नुकतीच वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. याशिवाय त्यांनी मनोरंजन विश्वातील कारकिर्दीला देखील 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आजवर आपल्या विनोदी भूमिकांमधून अशोक मामांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. अभिनयाची उत्तम जाण, विनोदाचं उत्तम अंग असलेले अशोकमामा 'बहुगुणी बहुरूपी' देखील आहेत. आता अशोक मामांचा 'फक्त मराठी सिने सन्मान' विशेष सन्मान होणार आहे.