Godavari: कसा आहे 'गोदावरी' चित्रपट? वाचा रिव्ह्यू
‘गोदावरी’ (Godavari) हा सिनेमा नितळ पाण्याची ओंजळ आपल्यापुढे रिती करतो, त्यात आपल्यातलं काय मिसळून त्याचा आस्वाद घ्यायचा ही सर्वस्वी आपली जबाबदारी.
पार्श्वभूमी
Godavari: काही सिनेमे किंवा काही कलाकृती अशा असतात ज्या पडद्यावर किंवा रंगमंचावर अगदी सहज घडतात मात्र तेवढ्याच सहजतेने त्याबद्दल शब्दात मांडणं शक्य होत नाही. ‘गोदावरी’ (Godavari) मला त्या वर्गातील सिनेमा वाटतो.
सिनेमा म्हणून पाहताना तो खूप काही सांगतो, खूप बोलतो, आतवर जाऊन हलवून टाकतो मात्र त्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात की या सिनेमाची गोष्ट काय आहे? किंवा तुला या सिनेमात काय आवडलं? किंवा नेमकं हा सिनेमा काय सांगतो? तेव्हा मात्र नि:शब्द व्हायला होतं. म्हणजे बोलण्यासारखं खूप काही असतानाही काहीच बोलू नये असं वाटतं. कारण ‘गोदावरी’ प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे.
आयुष्य खूप साधं, सोपं, सहज होऊ शकतं. गरज असते ती फक्त ‘अॅक्सेप्ट’ मोड ऑन करण्याची. कितीही टोकाची वाईट गोष्ट घडो एकदा ‘अॅक्सेप्टेड’ म्हणालो की पुढचा मार्ग दिसतो. ‘गोदावरी’ आपल्याला त्या स्वीकारण्याच्या भूमिकेकडे घेऊन जातो. जे घडतय, जे होतंय ते स्वीकारा पण वाहत राहणं सोडू नका. आता ते वाहत राहणं म्हणजे नेमकं काय, एखादी पराकोटीची गोष्टही किती संयतपणे स्वीकारली जाऊ शकते ते सारं ही ‘गोदावरी’ सांगते मात्र त्याचा अर्थ प्रत्येकाने आपआपल्या पातळीवर घ्यायचा.
हा सिनेमा नितळ पाण्याची ओंजळ आपल्यापुढे रिती करतो, त्यात आपल्यातलं काय मिसळून त्याचा आस्वाद घ्यायचा ही सर्वस्वी आपली जबाबदारी. थोडक्यात प्रेक्षक म्हणून आपल्याला आव्हान देणारा हा सिनेमा आहे.
यातल्या पात्रांची रचना, त्यांचा आलेख ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू. यातल्या प्रत्येक पात्रामध्ये एक स्वतंत्र गोष्ट लपलेली आहे. अर्थात ती पात्र जिवंत करणारी मंडळीही तेवढ्याच ताकदीची आहेत. विक्रम गोखले, संजय मोने, नीना कुळकर्णी, प्रियदर्शन जाधव मोहित टाकळकर आणि जितू हे सारेच कमाल आहेत. मात्र मला गौरी नलावडेने साकारलेली गौतमी जास्त भावली. मुळात लिखाणाच्या पातळीवरच ‘गौतमी’ विलक्षण ताकदीनं लिहिली गेलीय. आपल्या सर्वसाधारण विचारांच्या पलिकडं जाणारं आणि आपल्यालाही पलिकडं नेणारं ते पात्र आहे. ज्या स्वीकारण्याबद्दल हा सिनेमा आहे असं मला वाटतं त्याचं प्रतिनिधित्व गौरीनं साकारलेली ‘गौतमी’ करते.
प्राजक्त- निखिलची पटकथा, प्राजक्तचे मोजके पण परिणामकारक संवाद आणि शमिन कुलकर्णीचा कॅमेरा ही ‘गोदावरी’ पहिल्या फ्रेमपासून वाहती ठेवतात. ए. व्ही. प्रफुल्लचंद्रचं संगीत त्या शब्दांना आणि दृश्यांना आणखी प्रभावी बनवतं. आणि हे सगळं ज्याच्या दिग्दर्शनातून साकारलं गेलं त्या निखिल महाजनचं कौतुक करावं तेवढं थोडंच. संयत आणि नेमकं मांडणं कागदावर कदाचित जमू शकेल पण ते पडद्यावर उतरवणं खरंच कठीण असतं. निखिल त्यात जिंकला आहे.
शेवटी एवढंच सांगेन की हा सर्वसाधारण टिपिकल सिनेमा नाही. समजून घेण्याची गोष्ट आहे. ते सौंदर्य तुम्हाला शोधता आलं, टिपता आलं तर ही ‘गोदावरी’ तुमच्या नसानसातून वाहू लागेल यात शंका नाही.या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -