Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल फेटाळून लावत महाविकास आघाडीकडून निकालापूर्वीच जोरदार रणनीती आखण्यात येत आहे. निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. काल (22 नोव्हेंबर) संध्याकाळी एकाच गाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील एकत्र दिसून आले होते. यांनी एकत्रित बैठक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून एक्झिट पोल बाजूला ठेवत सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बड्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू केल्या आहेत.
जिंकलेल्या सर्व आमदारांना एकत्रित पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार
दरम्यान, उद्या निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीतील जिंकलेल्या सर्व आमदारांना एकत्रित पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांसाठी मुंबईत सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागांवरून संभ्रमावस्था असली तरी संभाव्य सरकार स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांच्या आणि छोट्या पक्षांची सुद्धा गरज भासू शकते, ही शक्यता लक्षात घेऊनच आतापासूनच महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांकडून त्यांच्याकडे संपर्क साधण्यात येत आहे.
छोट्या पक्षांना आणि निवडून येणाऱ्या अपक्ष आमदारांना गळ
दुसरीकडे, सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने महाविकास आघाडीने निकाल लागल्यानंतर वेळ घालवण्यापेक्षा निकाल लागण्यापूर्वीच संख्याबळ जमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. समविचारी पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे. महाविकास आघाडीमधील सर्वच नेत्यांनी सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जर आकडा कमी पडला तर महाविकास आघाडीकडून या छोट्या पक्षांना आणि निवडून येणाऱ्या अपक्ष आमदारांना गळ घालून आकडा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जे अपक्ष आमदार निवडून येऊ शकतील त्यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे. जिंकलेले आमदार कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबतच राहावे यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या