Maharashtra vidhansabha Election 2024 मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) गोटात हालचालींना सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीतील खास व्यक्तीने एक खळबळजनक दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. 


महाविकास आघाडीच्या नेत्याकडून संजय राऊत आणि नाना पटोले मारामारी करून घेऊ नये म्हणून खबदरदारी घेत नाना पटोले यांना जाणीवपूर्वक मिटिंगपासून दूर ठेवत आहेत. महाविकास आघाडीकडून सध्या वांझोट्या बैठका चालू आहेत. महिनाभरात महाविकास आघाडी सोडून लवकरच एक पक्ष महायुतीत सामील होईल. असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण (Suraj chavan) यांनी केला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी सुरज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे मोठं वक्तव्य केलं आहे. 


महायुतीच्या 160 सीट घासून नाही तर ठासून येणार- सुरज चव्हाण


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. बहुतांश भागात चांगल्या प्रकारे मतदान झाले आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंर एक्झिट पोल हाती आले आहेत. यामध्ये पुन्हा महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, एक्झिट पोल काहीही असले तरी जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. 23 नोव्हेंबरला महायुतीच्या 160 सीट पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण (suraj chavan) यांनी व्यक्त केला आहे. 


निकालापूर्वी ठाकरे गट सावध


विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्याचे समजते. मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केल्याचे समजते. 


टपाली आणि EVM मधील मतमोजणीसंदर्भातील बारकावे, कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी कालच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे.


महत्वाच्या बातम्या:


Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज