Hemangi Kavi On Kalavantancha Ganesh : घरोघरी गणपती बाप्पा (Ganapati Bappa) विराजमान झाले आहेत. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीदेखील बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) बाप्पासोबतचं तिचं नातं शेअर केलं आहे. 


एबीपी माझाशी बोलताना हेमांगी कवी म्हणाली,"बाप्पाचं आणि माझं नातं खूप वेगळं आहे. खूप लहान वयात बाप्पाचा आकार आपल्यासमोर आणला जातो. तसेच त्याचं लोभसवाणं रूप मी लहानपणीच पाहिलं आहे. मुळाच चित्र काढायला शिकले ते गणपतीचं चित्र काढून. मी काढलेलं पहिलं चित्र गणपती बाप्पाचं आहे. मला एका चित्रकला स्पर्धेत मिळालेलं पहिलं बक्षीस हे गणपती बाप्पाच्या चित्रासाठी मिळालेलं आहे". 



हेमांगी पुढे म्हणाली,"मला पहिलं बक्षीस जाहीर करत परिक्षक म्हणाले होते, तिने गणपतीचा आकार तिच्या वयाच्या मानाने चांगला नसेल काढला. पण तिचं निरक्षण खूप छान आहे. कारण मी भटजी, अगरबत्ती, उंदीर, मोदक अशा छोट्या-छोट्या गोष्टी काढल्या होत्या. त्यावेळी मी सात-आठ वर्षांची असेन. आजही ते चित्र माझ्याकडे आहे. पुढे कळत गेल्यावर गणपतीचं रूप मला आकृतीबंध करावसं वाटलं नाही. बाप्पा कधी मला जास्वंदीमध्ये दिसतो तर कधी ढगात दिसतो. एकंदरीतच बाप्पा मला सर्वत्र दिसतो". 


...अन् हेमांगीला वाटलं बाप्पा माझ्या पाठीशी


हेमांगी कवी बाप्पाची आठवण शेअर करत म्हणाली,"बाप्पाचा सोर्स त्याची एनर्जी नेहमी पाठिशी आहे, असं मला वाटतं. नाशकात आमच्या 'जन्मवारी' या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग छान झाल्यानंतर मी मेकअप काढत होते. मेकअप काढल्यानंतर मी माझ्या सहकलाकाराला गायला सांगितलं. तिने ते गाणं इतकं सुंदर गायलं की मी मेकअप काढता-काढता तिच्या जवळ गेले आणि तिला मिठी मारली. तिनेही काहीही आढेवेढे न घेता माझ्यासाठी गाणं गायलं. ज्याक्षणी मी तिला मिठी मारायला उठले त्याक्षणी माझ्या डोक्यावर असणारा दिवा फुटला. गणपती बाप्पा हा कलेचा देवता आहे. त्याचा हा दिसत नसलेला सोर्स आहे असं मला वाटतं". 


हेमांगी म्हणते,"बाप्पाकडे अशी एक शक्ती आहे जी नेहमी संकटांपासून वाचवते. गणपती घरात आणायची मला प्रचंड आवड आहे. पण त्यातलं सातत्य जपलं जाणार नाही याची मला भीती आहे. पण शूटिंग बाजूला ठेऊन हा सण साजरा करतात त्यांचं मला कौतुक वाटतं. गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर जो माहोल तयार होतो त्यात सामील व्हायला मला आवडतं. लहानपणी जर मला तक्रार करायची असेल तर मी बाप्पाकडे करायचे. त्याच्यासोबत गप्पा मारायचे. आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी मी बाप्पासोबत शेअर करायचे. बाप्पा माझा इमेजनरी मित्र होता". 


संबंधित बातम्या


Swapnil Joshi : रस्ता झाडणे, मांडव घालणे, स्पर्धा, प्रसाद, आरत्या... स्वप्नील जोशीला आजही आठवतो गिरगावातला गणेशोत्सव