Fighter Controversy :   बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी कमाईचे उड्डाण घेणारा फायटर सिनेमा (Fighter Movie) आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.मल्टिस्टारर असलेल्या चित्रपटात हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या पायलट्सची गोष्ट सांगण्यात आली आहे.  चित्रपटातील एका दृष्यावर हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे. एका दृष्यात हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत. 


हृतिक-दीपिकाच्या किसिंगच्या या दृष्यावर आक्षेप घेत आसाममध्ये पोस्टिंग असलेल्या भारतीय हवाई दलातील विंग कमांडरचे सौम्यदीप दास यांनी या दृष्यावर आक्षेप घेत स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे. 


विंग कमांडरने नोटीस पाठवली


विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी म्हटले की, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा किसिंग सीन म्हणजे हवाई दलाच्या गणवेशाचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. हवाई दलाचा गणवेश हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्याग, शिस्त आणि अखंड समर्पणाचे प्रतीक आहे. दृश्यात, कलाकार भारतीय हवाई दलाचे सदस्य म्हणून दिसू शकतात. त्याने गणवेशात असे करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 


दास यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, चित्रपटात रोमँटिक अँगल दाखवण्यासाठी या पवित्र गणवेशाचा वापर करणे चुकीचे आहे. आपल्या देशाच्या सेवेत असंख्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाच्या प्रतिष्ठेचे हे अवमूल्यन करते. हे गणवेशातील वाईट वर्तन देखील सामान्य करते, जे आमच्या सीमांचे रक्षण करणाऱ्यांना सोपवलेल्या जबाबदारीच्या विरूद्ध धोकादायक उदाहरण दर्शवत असल्याचा दावाही या नोटीसमध्ये केला आहे. 


नोटीसमध्ये पुढे म्हटले की, हवाई दलाच्या गणवेशात सार्वजनिक ठिकाणी रोमँटिक होणे हे  नियमांचे उल्लंघनच असून हवाई दलाच्या प्रतिबद्धतेबद्दल चुकीची प्रतिमा दर्शवते. हवाई दलाच्या जवानांकडून आपले कर्तव्य आणि कामाच्याबाबत बेजबाबदारपणा दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. 


जाहीर माफी मागा... 


हा सीन हटवण्याची मागणी विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी 'फायटर'च्या निर्मात्यांना केली आहे. निर्मात्यांनी जगासमोर हवाई दल आणि त्यांच्या सैनिकांची माफी मागावी, असेही ते म्हणाले. चित्रपट निर्मात्यांनी भविष्यात हवाई दलाच्या सैनिकांचा आणि गणवेशाचा अशा प्रकारे अनादर करणार नाही, अशी लेखी हमी द्यावी अशी मागणी दास यांनी केली. 


हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइटर' हा चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने बनवला आहे. या चित्रपटाने जगभरात 350 कोटींची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई 178 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, अनिल कपूर आणि इतर स्टार्सनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.