एकाच सुपरस्टारसोबत पदार्पण, मोठ्या बहिणीला तुफान स्टारडम, धाकटी बॉलीवूडमधून गायब; कर्करोगाने घेतला जीव
एकच स्वप्न उराशी घेऊन दोघींनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, एकाच सुपरस्टारसोबत करिअरची सुरुवात केली, पण नशिबाने मात्र दोघींना वेगवेगळे मार्ग दाखवले

Bollywood: चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी केवळ टॅलेंट पुरेसं नसतं, तर नशीबही तितकंच साथ देणं गरजेचं असतं. अनेकदा एकाच घरात जन्मलेल्या भावंडांचं भविष्यही पूर्णपणे वेगळं असतं. आज आपण अशाच दोन बहिणींची गोष्ट जाणून घेणार आहोत. एकच स्वप्न उराशी घेऊन दोघींनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, एकाच सुपरस्टारसोबत करिअरची सुरुवात केली, पण नशिबाने मात्र दोघींना वेगवेगळे मार्ग दाखवले.या बहिणी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि त्यांची धाकटी बहीण सिंपल कपाडिया. दोघींनीही त्या काळातील सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
रातोरात स्टार, राजेश खन्नांशी लग्न
डिंपल कपाडियांनी 1973मध्ये ‘बॉबी’ या चित्रपटातून पदार्पण केलं. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि डिंपल रातोरात स्टार बनल्या. या यशानंतर काही काळातच त्यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं आणि काही वर्षांसाठी अभिनयापासून दूर राहिल्या. मात्र नंतर केलेल्या पुनरागमनानंतर ‘सागर’, ‘रुदाली’ यांसारख्या चित्रपटांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘रुदाली’साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. वैयक्तिक आयुष्यात मात्र 1982 पासून त्या राजेश खन्ना यांच्यापासून वेगळी राहू लागली.

बॉलिवूडमधून एक्सिट, कॅन्सरने मृत्यू
दुसरीकडे, सिंपल कपाडियांनी 1977मध्ये ‘अनुरोध’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. या चित्रपटात मुख्य भूमिकेत त्यांचे जिजा राजेश खन्ना होते. मात्र सिंपलला अभिनयात अपेक्षित यश मिळालं नाही. काही चित्रपटांनंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडलं आणि फॅशन व कॉस्ट्युम डिझाइनिंगकडे वळल्या. या क्षेत्रात त्यांनी चांगली ओळख निर्माण केली आणि ‘रुदाली’ चित्रपटासाठी बेस्ट कॉस्ट्युम डिझाइनचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला.

दुर्दैवाने, 2006 मध्ये सिंपल कपाडियांना कर्करोगाचं निदान झालं. दीर्घकाळ या आजाराशी झुंज दिल्यानंतर 10 नोव्हेंबर 2009 रोजी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं. एकाच घरात जन्मलेल्या, एकाच सुपरस्टारसोबत पदार्पण केलेल्या या बहिणींची आजही बॉलिवूडमधील नशिबाच्या फेऱ्यात एखादी व्यक्ती कशी अडकते याचं उत्तम उदाहरण ठरतात.























