मुंबई : सुपरस्टार रजनीकांत याचा दरबार सिनेमा आज रिलीज झाला आहे. या निमित्ताने सायनमधील चित्रपटगृहात रजनीकांत यांच्या चाहत्यांनी जल्लोष करत रजनीकांत यांच्या पोस्टरवर दुधाने अभिषेक केला आहे. रजनीकांत यांनी वयाची सत्तरी गाठल्याने त्यांचं 70 फुटी पोस्टर तयार करण्यात आलं आहे.

रजनीकांत यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने सायन येथील पीव्हीआर चित्रपटगृहामध्ये रजनीकांत यांच्या चाहत्यांनी मोठ्या जल्लोष केला. रजनीकांत यांच्या सिनेमाचं उत्साह त्यांच्या चाहत्यांमध्ये एखाद्या सणाप्रमाणे असतो आणि रजनीकांत यांचे फॅन्स तो साजरा ही तसाच करतात. सध्या ट्विटरवरही #DarbarFDFS, #DarbarReview, #DarbarFromToday असे ट्रेंड होत आहे.


दरबार चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगादास करीत असून सुनील शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतकेच नाही तर मदुराई येथे रजनीकांतच्या चाहत्यांनी त्याच्या आगामी 'दरबारट चित्रपट यशस्वी होण्यासाठी मंदिरात खास प्रार्थना देखील केली. चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून चाहत्यांनी 15 दिवसांचा उपवास केला आहे, जमिनीवर जेवण केले आहे. दक्षिणेकडे अशी ही रजनीकांतची क्रेझ पाहायला मिळत आहे. 70 महिलांना साड्या भेट देणार आहे.  होम हवन आणि इतर कार्यक्रमही होणार आहेत.


चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका खास विमानाची व्यवस्था करण्यात आली होती आणि या फ्लाइटवर रजनीकांत यांचे मोठे चित्र पाहायला मिळाले. या फ्लाइटचे नाव दरबार फ्लाइट ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे या चित्रपटात रजनीकांत 27 वर्षानंतर पोलिसाच्या भूमीकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग मुंबईत झाले असून उर्वरित चित्रीकरण चेन्नई येथे झाले आहे.

2021 ला रजनीकांत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील चाहत्यांकडून या वेळी व्यक्त करण्यात आला.