Dharmaveer 2 : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या टीमने साहेबांच्या शक्तीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. तसेच अधिकृतरित्या सिनेमाची घोषणा केली. प्रवीण तरडे (Pravin Tarde) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. या सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले,"हिंदुत्वाची व्याख्या बदलायला लावणारा हा सिनेमा असणार आहे".
'धर्मवीर 2'बद्दल बोलताना प्रवीण तरडे म्हणाले,"सिनेमाच्या नावातच सर्व काही आहे. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2' (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमात साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. हिंदूत्व म्हटल्यावर डोळ्यासमोर दंगल येते. त्यामुळे 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला हिंदुत्वाची व्याख्या बदलायची आहे. हिंदुत्व हे सर्वसमावेश आहे, व्यापक आहे".
"सर्वांना सामावून घेणारी एक वृत्ती म्हणजे हिंदुत्व" : प्रवीण तरडे
प्रवीण तरडे पुढे म्हणाले,"हिंदुत्व म्हणजे काय तर तुमच्या भागातल्या एका मुलाला शाळा-कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळत नसेल तर दिघे साहेब जे करायचे त्या एका कृतीमध्ये हिंदुत्व दडलेलं आहे. कोणत्या माणसाला कोणत्या वेळी कसा सन्मान द्यायचा, सर्व जातीतील मंडळींना एकत्र सामावून एकत्रित कसं पुढे जायचं हे हिंदुत्व आहे. त्यामुळे साहेबांच्या हिंदुत्वाची ही व्यापक व्याख्या 'धर्मवीर 2'मध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांना सामावून घेणारी एक वृत्ती म्हणजे हिंदुत्व. प्रत्येकाला प्रत्येकाची आब राखणारी वृत्ती म्हणजे हिंदुत्व".
धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओक (Prasad Oak) म्हणाला,"धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'प्रमाणे 'धर्मवीर 2'देखील आम्ही तितकाच उत्तम बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहेबांच्या आशीर्वादामुळे ही कलाकृती उत्तमच बनेल. प्रवीणसारखा उत्तम लेखक, दिग्दर्शक, मंगेशसारखा (Mangesh Desai) भक्कम निर्माता आणि एकनाथ शिंदेंसारखे नेते पाठिशी असल्यामुळे काही अडचणी येऊ शकत नाही".
'धर्मवीर 2'च्या वेळेला जबाबदारी वाढली आहे : प्रसाद ओक
प्रसाद ओक पुढे म्हणाला,"आनंद दिघे यांचे वेगवेगळे पैलू आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दिघे साहेब दिसलेले आहेत. समाजकार्य करताना, लहान मुलांसोबत वेळ घालवताना प्रत्येक वेळेला वेगळ्या रुपात ते दिसले आहेत. आता त्यांचं हे रूप वेगवेगळ्याप्रकारे चितारण्याचं कौशल्य प्रवीणकडे आहे. 'धर्मवीर 2'च्या वेळेला जबाबदारी वाढली आहे. या सिनेमाचा तिसरा भाग आला तर जबाबदारी आणखी वाढणार आहे".
संबंधित बातम्या