Mangesh Desai ON Dharmaveer 2 : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली आहे. 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं मंगेश देसाई म्हणाले.


'धर्मवीर 2' या सिनेमाबद्दल बोलताना एबीपी माझाशी बोलताना निर्माते मंगेश देसाई म्हणाले,"अंदाजे नोव्हेंबर महिन्यात 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन आपले साहेब आहेत. दिघे साहेबांच्या काही गोष्टी 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. पण तरी त्यांच्या अनेक गोष्टी वेळेच्या मर्यादेमुळे सिनेमात दाखवण्यात आल्या नाहीत. या दोन्ही साहेबांचा अजेंडा हा 'हिंदुत्व' होता. त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 'धर्मवीर 2'मध्ये दाखवण्यात येणार आहे".


'धर्मवीर 2'मध्ये काय पाहायला मिळणार? 


'धर्मवीर 2'मध्ये काय पाहायला मिळणार याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले की,"ज्वलंत हिंदुत्वासाठी दिघे साहेबांनी अनेक आंदोलने केली आहे. दिघे साहेबांचं चरित्र दाखवताना दोन भाग नव्हे तर चार भागही पुरणार नाहीत. एवढ्या त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांच्या अनेक गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत. मलंगगड, बाबरी मस्जिद दहावीची सराव परिक्षा दिघे साहेबांनी सुरू केलेली आहे. तसेच निवडणुकीची स्टॅटर्जी ते कशाप्रकारे आखायचे  अशा बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांचं प्रबोधनदेखील करेल".


'धर्मवीर' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. त्यात कोणी हिंदुत्व न मानणाऱ्यांसोबत गेलं तर कोणी बाळासाहेबांच्या विचारावर ठाम राहिलं आणि वेगळा मार्ग निवडला. तरी आमचंच हिंदुत्व खरं, असं तेही आणि हेही म्हणतात. त्यामुळे आता 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या माध्यमातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट जाणीवपूर्वक स्पष्ट करणार आहात का? याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले,"राजकारण आणि सिनेमा हे दोन्ही माझ्यासाठी वेगवेगळे भाग आहेत. 'धर्मवीर' सिनेमा बनवताना माझा कोणताही अजेंडा नव्हता. मनोरंजनसृष्टीतला एक निर्माता म्हणून मी या सिनेमाची निर्मिती केली आहे. बऱ्याच गोष्टी योगायोगाने घडत असतात. त्यातली ही योगायोगाने घडलेली गोष्ट आहे. पण साहेबांच्या ज्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत. त्या दाखवण्याचा प्रयत्न 'धर्मवीर 2' मध्ये करण्यात येईल. दिघे साहेबांच्या प्रत्येक कृतीत हिंदुत्वाची जोड आहे आणि हीच जोड आता भाग दोन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत". 


दिघे साहेब म्हणजे उत्साह : मंगेश देसाई


दिघे साहेबांकडे कसे पाहता याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले,"दिघे साहेब म्हणजे उत्साह. प्रत्येकवेळेस दिघे साहेबांबद्दल बोलताना अंगावर काटा येतो. मी त्यांना एक शक्ती म्हणून घेतो. आनंद दिघे साहेबांकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन हा शक्ती, उत्साह, निश्चय आणि आत्मविश्वास आहे. आनंद दिघे साहेबांसोबत माझी दोनदा भेट झाली आहे. माझं 'जाऊबाई जोरात' हे नाटक पाहायला दिघे साहेब आले होते. त्यानंतर माझ्या एका मित्राच्या दुकानाच्या ओपनिंगला दिघे साहेब आले होते. 


संबंधित बातम्या


Dharmaveer 2 : "उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..."; प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी केली 'धर्मवीर-2' ची घोषणा