Salman Khan, Deepak Tijori : 90च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता दीपक तिजोरी (Deepak Tijori) आता दिग्दर्शक बनला आहे. दीपक तिजोरी अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग बनला होता. तसेच, त्याने अनेक मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन देखील शेअर केली आहे. दीपक तिजोरी 80 आणि 90च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग बनला होता. ‘आशिकी’, ‘खिलाडी’, ‘जो जीता वही सिकंदर’, कभी हा कभी ना’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला होता. या सगळ्यात तो आणखी एका मोठ्या चित्रपटाचा भाग बनू शकला असता. मात्र, ती भूमिका त्याच्या ऐवजी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) पदरात पडली.


कदाचित या चित्रपटामुळे दीपक तिजोरीच्या करिअरला एक मोठं वळण मिळालं असतं. मात्र, हा चित्रपट सलमानच्या वाट्याला गेला. या चित्रपटाचे नाव होते ‘मैने प्यार किया’. सलमान खान याला अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा आहे.


आम्ही दोघे स्पर्धा करत होतो, पण...


बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत दीपक तिजोरी यांनी आपल्या मनातील ही खदखद व्यक्त केली. या विषयी बोलताना दीपक म्हणाला, ‘हो. सलमान खान आणि मी दोघांनी त्या एकाच भुमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मी सलमानसोबत स्पर्धा करत होतो. पण, सूरज बडजात्या यांनी नंतर मला सांगितले की, प्रसिद्धीचा विचार करता बडजात्या कुटुंबाने सलमान खानला या चित्रपटासाठी निवडण्याचा निर्णय घेतला. प्रेमच्या भूमिकेसाठी मी आणि सलमान असे दोनच जण एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून स्पर्धा करत होतो.


दीपक पुढे म्हणाला की, ‘या भूमिकेविषयी चर्चा करताना त्यांनी मला असेही सांगितले की, जर त्यांनी माझी निवड केली तर, ते माझे नाव बदलू इच्छितात आणि मला कसे लॉन्च करायचे आहे, यावर विचार करावा लागेल.’


‘मैंने प्यार किया’ने बदललं सलमानचं नशीब


‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट खूप गाजला आणि त्याने सलमानच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेले. या चित्रपटात सलमानने ‘प्रेम’ची भूमिका केली होती, तर अभिनेत्री भाग्यश्री ‘सुमन’च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटावेळी भाग्यश्री अवघी 18 वर्षांची होती. तिने चित्रपटातील रोमँटिक दृश्याची एक मनोरंजक गोष्ट शेअर केली होती.


भाग्यश्रीने शेअर केला किस्सा


तिने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले होते की, ‘मी फक्त 18 वर्षांची होते आणि मला वाटले की, मी प्रेमात आहे आणि आता लग्न करणार आहे. मी तोपर्यंत कधीही एखाद्या मुलाला मिठी मारली नव्हती. त्यामुळे, मैने प्यार कियामधील गाण्याच्या सीक्वेन्स दरम्यान मला सलमानला मिठी मारावी लागणार, हे ऐकून मी काळजीत पडले होते आणि यामुळे मला रडू येत होतं’.


तिने सांगितले की, अर्धा तास सलमान खान आणि सूरज सर यावर उपाय शोधत होते. कारण त्यांना सुमन आणि प्रेममधील हा प्रेमाचा उत्कट बंध दाखवायचा होता. अर्ध्या तासानंतर सलमान तिच्याकडे आला, तेव्हाही तिच्या डोळ्यांत अश्रू होतेच. भाग्यश्री म्हणाली, ‘सालमन आला आणि त्याने निरागसपणे माझ्याकडे विनवणी केली आणि म्हणाला, 'प्लीज सीन कर', यावर मी त्याला नकार देऊ शकलो नाही आणि अशा प्रकारे मी शेवटी तो सीन करण्यास तयार झाले.’


हेही वाचा :


Salman Khan : सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू : संजय पांडे


Salman Khan : 'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही'; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा दावा


Salman Khan : सलमान खानला मिळालेल्या पत्राचा तपास सुरू; दबंग खानने नोंदवला जबाब